मुंबई। वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात चेन्नईने अखेरच्या क्षणी मुंबईवर १ विकेटने मात केली. चेन्नईच्या विजयात ड्वेन ब्रावोची आक्रमक अर्धशतकी खेळी तसेच दुखापत ग्रस्त असणाऱ्या केदार जाधवची अखेरच्या क्षणाची जिगर महत्वाची ठरली.
मुंबईने चेन्नईला विजयासाठी २० षटकात १६६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सुरुवात चांगली केली होती. पण त्यांना चांगल्या सुरवातीचा फायदा घेता आला नाही.
हार्दिक पंड्याने चेन्नईचा सलामीवीर फलंदाज शेन वॉटसनला(१६) बाद करून चेन्नईला पहिला धक्का दिला. त्यापाठोपाठ लगेचच सुरेश रैना(४) आणि अंबाती रायडूही(२२) बाद झाले.
यानंतरही चेन्नईला यातून सावरण्याचा अपयश आले. चेन्नईच्या बाकी फलंदाजांनी नियमित कालांतराने आपल्या विकेट्स गमावल्या. त्यात मार्कंडेने रायडू, एम एस धोनी(५) आणि दीपक चाहरला(०) बाद करून मुंबईचे मनोबल वाढवले. त्यामुळे चेन्नईची अवस्था १६.३ षटकात ८ बाद ११८ धावा अशी झाली होती.
पण यानंतर अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने इम्रान ताहिरला साथीला घेऊन मुंबईच्या गोलंदाजीवर आक्रमण करायला सुरुवात केली. त्याने चौकार षटकारांची आतिषबाजी करताना ३० चेंडूंतच ६८ धावा केल्या. यात त्याने ७ षटकार आणि ३ चौकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईला अशक्य वाटणारा विजय शक्य झाला.
मात्र चेन्नई विजयाच्या समीप असताना ब्रावो बाद झाला. त्यामुळे अखेरच्या षटकात दुखापत ग्रस्त झाल्याने रिटायर्ड हर्ट म्हणून बाहेर गेलेल्या केदार जाधवला पुन्हा मैदानात यावे लागले.
या शेवटच्या षटकात चेन्नईला ७ धावांची गरज होती पण पहिले तीन चेंडूंवर केदारला एकही धाव घेता आली नाही. त्यानंतर मात्र त्याने षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार मारला आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर चौकार ठोकत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. केदारने २२ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या.
चेन्नईच्या बाकी फलंदाजांपैकी रवींद्र जडेजा(१२), हरभजन सिंग(८), मार्क वूड(१) आणि इम्रान ताहीर(२*) यांनी धावा केल्या.
मुंबईकडून मार्कंड (३/२३), हार्दिक पंड्या(३/२४),मिचेल मॅकग्लेन(१/४४), मुस्तफिझूर रहमान(१/३९) आणि जसप्रीत बुमराह(१/३७) यांनी विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १६५ धावा केल्या होत्या. मुंबईकडून कृणाल पंड्या(४१*), सूर्यकुमार यादव(४३) आणि ईशान किशन(४०) यांनी चांगली लढत दिली. तसेच अन्य फलंदाजांपैकी एवीन लेविस(०), कर्णधार रोहित शर्मा(१५) आणि हार्दिक पंड्या(२२*) यांनी धावा केल्या.
चेन्नईकडून शेन वॉटसन(२/२९), दीपक चहर(१/१४) आणि इम्रान ताहीर(१/२३) यांनी विकेट्स घेतल्या.