आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत आयपीएलमध्ये रंगतदार आणि चुरशीचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलच्या या मोसमात सर्व संघ तुल्यबळ दिसत आहेत. आतापर्यंत सर्व संघांनी एकतरी विजय मिळवला आहे आणि एकतरी पराभवाचा सामना सर्व संघांना करावा लागला आहे.
या मोसमात अनेक दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. प्रत्येक संघात जबरदस्त खेळाडू आहेत आणि ते त्यांच्या संघासाठी खूप महत्वाचे खेळाडू ठरले आहेत. यातील काही खेळाडूंना सतत खेळण्याची संधी मिळत आहे पण असे बरेच खेळाडू आहेत ज्यांना या आयपीएलच्या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि ते अजूनही बेंचवर बसले आहेत.
या लेखात आम्ही तुम्हाला अशा ३ दिग्गज खेळाडूंबद्दल सांगू ज्यांना अद्याप यावर्षी आयपीएल हंगामातील एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
या आयपीएल हंगामात एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेले ३ दिग्गज खेळाडू
३. ख्रिस लिन
या आयपीएल हंगामात ऑस्ट्रेलियन सलामीवीर ख्रिस लिनला अद्याप एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. मुंबई इंडियन्सच्या ख्रिस लिनचा अलीकडील फॉर्म चांगला नव्हता. सीपीएलमध्येही तो धावा करण्यात अपयशी ठरला. याशिवाय मुंबई इंडियन्स संघाकडे रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकच्या रूपात दोन दिग्गज सलामीवीर आहेत. यामुळेच ख्रिस लिनसाठी मुंबई इंडियन्स संघात जागा मिळाणे कठीण आहे.
ख्रिस लिनला आयपीएलच्या लिलावात मुंबईने २ कोटींमध्ये विकत घेतले होते. पण आतापर्यंत तो मैदानाबाहेर बसला आहे. आयपीएल कारकिर्दीत त्याने एकूण ४१ सामने खेळले असून त्यात त्याने १० अर्धशतकांसह १२८० धावा केल्या आहेत.
२. इम्रान ताहिर
चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहिरलाही या हंगामात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. इम्रान ताहिरने सीपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, परंतु चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे संयोजन असे आहे की इम्रान ताहिरला अंतिम अकरामध्ये स्थान मिळत नाही.
सीएसकेच्या अंतिम अकरामध्ये शेन वॉटसन, फाफ डू प्लेसी, सॅम करन आणि ड्वेन ब्राव्हो असे ४ परदेशी खेळाडू खेळत आहेत. या कारणास्तव इम्रान ताहिरला जागा मिळत नाही. त्याने आयपीएल खेळलेल्या एकूण ५५ सामन्यात ७९ बळी मिळवले आहेत. ४/१२ अशी त्याची सर्वोत्कृष्ठ कामगिरी आहे.
१. ख्रिस गेल
किंग्स इलेव्हन पंजाबचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलला या हंगामात अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. ख्रिस गेलसारख्या फलंदाजाला बाहेर बसवणे हा एक धक्कादायक निर्णय आहे. त्याच्यासारख्या फलंदाजाला अंतिम अकरामध्ये खेळवणे कोणत्याही संघाला आवडेल. पण किंग्ज इलेव्हन पंजाबचे संयोजनही असे आहे की गेलला अंतिम अकरामध्ये स्थान मिळत नाही.
किंग्ज इलेव्हन पंजाबकडून केएल राहुल आणि मयंक अगरवाल सलामीला खेळताना चांगली कामगिरी करत असून त्यांनी आतापर्यंतच्या सामन्यात जबरदस्त डाव खेळले आहेत. यामुळेच गेलला अंतिम अकरामध्ये स्थान मिळवता आले नाही आणि त्याला बाहेर बसावे लागले आहे.