आयपीएलच्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबर २०२० पासून यूएईमध्ये सुरुवात झाली. प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद फक्त टीव्हीवर घेत आहेत. भारतीय आणि परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवत आहेत. या स्पर्धेत काही भावांच्या जोड्याही खेळताना दिसत आहेत. यात भाऊ भावाच्या विरोधात खेळताना दिसतो तर, एक जोडी एकाच संघातून एकत्र खे;खेळते. या लेखात यंदा आयपीएलमध्ये खेळात असणाऱ्या ३ भावांच्या जोड्यांचा उल्लेख आहे.
आयपीएल २०२०मध्ये खेळत असलेल्या ३ भावांच्या जोड्या
सॅम करन – टॉम करन
इंग्लंडचा खेळाडू सॅम करन याला २०१९मध्ये सर्वप्रथम आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाने विकत घेतले. तर या वर्षीच्या लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या संघात सामील करून घेतले. त्यानेही या १३ व्या हंगामातील २ सामन्यात ४ बळी घेतले आणि स्वतःची निवड सिद्ध केली आहे.
त्याचाच मोठा भाऊ टॉम करन याने कोलकाता नाईट रायडर्सकडून २०१८ मध्ये आयपीएल खेळण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये त्याने फक्त ५ सामने खेळले, आयपीएल २०१९ मध्ये तो दिसला नाही. यंदा त्याला राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात घेतले आहे. तो एक अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या १३ व्या हंगामात करन बंधू चौथ्याच सामन्यात आमने-सामने आले होते.
दीपक चाहर – राहुल चाहर
दीपक चाहरने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २०१६ मध्ये केली होती. तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स, राजस्थान रॉयल्सकडून खेळाला आहे आणि आता तो चेन्नई सुपरकिंग्जचा एक भाग आहे.
त्याचा धाकटा चुलत भाऊ राहुल चाहर सध्या मुंबई इंडियन्सचा भाग आहे. राहुल चाहरने आयपीएलमध्ये २०१७ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. दोन्ही भाऊ आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघातून आपली जबरदस्त कामगिरी करत आहेत. तसेच ते दोन वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करत असताना अनेकदा आमने-सामने आले आहेत.
कृणाल पंड्या – हार्दिक पंड्या
आयपीएलमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली असेल तर ती पंड्या बंधूंची जोडी आहे. ही जोडगोळी मागील अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. कृणाल पंड्याने २०१६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास सुरुवात केली. तो चार वर्षांपासून या संघाशी संबंधित आहे. तर हार्दिक पंड्या त्याच्या एक वर्ष अगोदर २०१५ मध्ये संघात सामील झाला होता. दोन भावांची जोडी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून जबरदस्त कामगिरी करत आहे. दोन्ही खेळाडूंची आयपीएलच्या माध्यमातून भारतीय संघातही निवड झाली आहे.