आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. याआधी हा हंगाम मार्च ते मे दरम्यान होणार होता. पण कोरोना व्हायरसच्या संकटामुळे या हंगामाला स्थगिती देण्यात आली होती. परंतू आता हा हंगाम भारताबाहेर युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
भारतातील कोरोना व्हायरसचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन हा हंगाम युएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आता आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ८ संघांनी युएईला जाण्यासाठी तयारी सुरु केली आहे. युएईला जातानाही संघांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे, तसेच युएईला पोहचल्यानंतरही खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणातून बाहेर जाण्याची परवानगी असणार नाही. यामागे खेळाडूंची सुरक्षा हे महत्त्वाचे कारण आहे.
युएईला रवाना होण्याच्या संघांच्या अचूक वेळापत्रकांबद्दल अद्याप संदिग्धता आहे. तरी सर्व संघ युएईसाठी २० ते २३ ऑगस्टच्या दरम्यान रवाना होणार असल्याची चर्चा आहे. त्याआधी खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी होईल.
स्पोर्ट्सस्टारने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली कॅपिटल्स आणि सनराझर्स हैद्राबाद एकत्र चार्टर्ड फ्लाइटने मुंबईहून २३ ऑगस्टला युएईसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. तर चेन्नई सुपर किंग्स(सीएसके) २१ ऑगस्टला युएईसाठी निघेल.
सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी सांगितले की, ‘आमचे सर्व भारतीय खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी आमच्या नियोजित शिबिरानंतर (१६ ते २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या) चेन्नईहून एकत्र युएईसाठी निघतील.’ पण चेन्नईला पोहचण्याआधी खेळाडूंची कोरोना चाचणी होईल, त्यानंतर युएईला जाण्याआधी २ चाचण्या होतील.
याबरोबरच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने त्यांच्या देशांदर्गत खेळाडूंसाठी मुंबईबाहेर सराव सत्र आयोजित करायला सुरुवात केली आहे. हा संघ २१ ऑगस्टला युएईला जाण्याची शक्यता आहे.
तसेच कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघ २० किंवा २१ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या चार्टर्ड फ्लाईटने मुंबईहून युएईला जाण्यासाठी निघतील. त्याचबरोबर किंग्स इलेव्हन पंजाबची अजून युएईला रवाना होण्याची अंतिम तारिख ठरलेली नाही,
विराट कोहली कर्णधार असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ कदाचीत सर्वात शेवटी युएईला रवाना होण्याची शक्यता आहे. त्यांचा संघ बंगळुरुहून २२ किंवा २३ ऑगस्ट रोजी रवाना होईल. या आठवड्यात त्यांचे खेळाडू बंगळुरुला पोहचल्यानंतर एका आठवड्यासाठी क्वारंटाईन होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
जन्माष्टमीच्या खास प्रसंगी ‘कॅप्टन कूल’ धोनी वाजवतोय बासरी; व्हिडिओ झाला व्हायरल
ट्रेंडिंग लेख –
४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला
ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी
कसोटी क्रिकेटमधील सर्वात धीमी खेळी करणारे ५ फलंदाज; एबी डिव्हिलियर्सचाही आहे समावेश