---Advertisement---

पुरंदरच्या ‘या’ पठ्ठ्याने चेन्नईची लाज राखली; सलग तीनही सामन्यात ठोकली अर्धशतके

On: रविवार, नोव्हेंबर 1, 2020 8:09 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० मधील ५३ वा सामना रविवारी (१ नोव्हेंबर) अबु धाबी येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. हा सामना चेन्नई संघाने ९ विकेट्सने जिंकला. साखळी सामन्यातील चेन्नईचा हा शेवटचा सामना होता. या विजयाचा हीरो ऋतुराज गायकवाड ठरला. त्याने या हंगामात चेन्नई संघाकडून खेळताना सलग ३ अर्धशतके ठोकण्याचा कारनामा केला.

नाणेफेक जिंकून चेन्नई संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १५३ धावा केल्या होत्या. हे आव्हान चेन्नईने अवघ्या १८.१ षटकात १ विकेट्स गमावत पूर्ण केले.

चेन्नईकडून सलामीला फलंदाजीसाठी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस उतरले. यादरम्यान दोघांनीही चांगली फटकेबाजी करत संघाला संघाला चांगली सुरुवात दिली. पुढे डू प्लेसिस ४८ धावा करत दहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तंबूत परतला. त्यानंतर ऋतुराजने अंबाती रायडूसोबत आव्हानाचा पाठलाग केला. यावेळी ऋतुराजने ४९ चेंडूंत सर्वाधिक नाबाद ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ६ चौकार ठोकले. यासोबतच रायडूनेही ३० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या अर्धशतकासह ऋतुराजने चेन्नईकडून सलग ३ अर्धशतके करण्याचा कारनामा केला. मागील दोन सामन्यात खेळताना ऋतुराजने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ७२ धावा, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ६५ धावा केल्या होत्या.

पंजाबकडून गोलंदाजी करताना केवळ वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनला १ विकेट घेता आली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाकडून दीपक हुडाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३० चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. यासोबतच केएल राहुल (२९) आणि मयंक अगरवालने (२६) धावा केल्या. याव्यतिरिक्त इतर फलंदाज २० धावांच्या आतच गारद झाले.

चेन्नईकडून गोलंदाजी करताना लुंगी एंगिडीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकात ३९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्यासोबतच शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि इम्रान ताहीरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

चेन्नई संघाने हा सामना जिंकला असला, तरी ते या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---