आयपीएलच्या १३व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. एक युवा फलंदाज म्हणून पडिक्कलने उत्तम कामगिरी बजावली आणि आरसीबीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने १५ सामन्यात ४७३ धावा केल्या. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पडिक्कलने कर्णधार विराट कोहलीची प्रशंसा केली आहे.
या हंगामात पडिक्कलला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबरोबर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. विराटबरोबर फलंदाजी करताना त्याला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. ज्याप्रकारे यंदाच्या आयपीलमध्ये पडिक्कलने फलंदाजी केली, ते पाहून कोहलीने वेळोवेळी त्याची स्तुती केली व त्याच्या कामगिरीमुळे कर्णधार कोहली आनंदीही दिसला.
अबूधाबी येथे झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दोन्ही क्रिकेटपटूंनी ९९ धावांची चांगली भागिदारी रचली. त्या सामन्यानंतर विराट कोहलीने पडिक्कलला एक प्रतिभावान खेळाडू म्हणून संबोधले होते.
नुकत्याच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पडिक्कलने कर्णधार विराट कोहलीची खूप प्रशंसा केली. त्याने विराट कोहलीसोबत केलेल्या फलंदाजीच्या अनुभवाबद्दल देखील सांगितले.
पडिक्कलने सांगितले की, “हा माझ्यासाठी एक खास अनुभव होता. विराट कोहली जगातील महान खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. त्याच्यासोबत फलंदाजी करताना मला बरंच काही शिकायला मिळाले. ही माझ्यासाठी एक अशी गोष्ट होती ज्याचा आनंद मी प्रत्येक क्षणी घेतला.”
पडिक्कलने आपल्या आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्याबाबतीतही खुलेपणाने उत्तरे दिली. “मी नेहमी या संघात खेळण्याचे स्वप्न पाहत असायचो अन् ते स्वप्न आता पूर्ण झाले. आरसीबी संघात एवढया मोठ्या प्रतिभावान खेळाडूंसोबत खेळणे ही खूप मोठी गोष्ट होती,” असे तो म्हणाला.
“आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव खूपच छान होता. क्रिकेटच्या जगातील दिगग्ज खेळाडूंसोबत खेळणे खूप मोठी गोष्ट आहे. आरसीबीकडून मी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि पूर्ण सामन्यात मला या गोष्टीचा अभिमान वाटत होता. कारण या संघात खेळण्याचे स्वप्न मी खूप मोठ्या काळापासून पाहात होतो,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआय झाली मालामाल, आयपीएलमधून कमावले ‘इतके’ कोटी
‘त्याला बाद झाल्याने फरक पडत नाही’, माजी दिग्गजाचे पृथ्वी शॉवर टिकास्त्र
आयपीएल २०२१ होणार अधिक रोमांचक, एका संघात खेळणार पाच विदेशी खेळाडू?