मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दुबई येथे झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने दिल्ली कॅपिटल्सवर ८८ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकत हैदराबादने गुणतालिकेत सहावा क्रमांक पटकावला आहे. सोबतच प्लेऑफच्या आशाही कायम ठेवल्या आहेत. दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार डेविड वॉर्नरने वाढदिवसाच्या दिवशीच तडाखेबंद अर्धशतकी खेळी करत विजयात मोठा वाटा उचलला.
नाणेफेक जिंकून दिल्लीने हैदराबादला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून वॉर्नर (६६) आणि वृद्धिमान साहा (८७) या दोघांनीही शानदार खेळी केली. त्यांच्या या खेळीमुळे संघाने २ विकेट्स गमावत तब्बल २१९ धावांचा डोंगर दिल्लीपुढे उभारला होता. आतापर्यंत दिल्लीने मोठे आव्हान सहजपणे पार केले होते. परंतु हैदराबादच्या गोलंदाजीसमोर हे आव्हान दिल्लीला पार करता आले नाही. त्यांचा डाव १३१ धावांवरच संपुष्टात आला.
विशेष म्हणजे वॉर्नरने साहासोबत पावर प्लेमध्येच एकही विकेट न गमावता ७७ धावा कुटल्या होत्या. हा आयपीएल २०२० मध्ये पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम राजस्थान रॉयल्स संघाच्या नावावर होता. त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना १ विकेट गमावत ६९ धावा केल्या होत्या.
दिल्लीविरुद्धच्या विजयात हैदराबादच्या विजयाचे हीरो ठरलेल्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया…
डेविड वॉर्नर
सनरायझर्स हैदराबादसाठी हा करा किंवा मरा सामना होता. यात कर्णधार डेविड वॉर्नरने उल्लेखनीय खेळी केली. त्याने केवळ ३४ चेंडूत २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावा कुटल्या. वॉर्नरने २५ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. यासोबतच वॉर्नर आयपीएल २०२० च्या हंगामात पावरप्लेमध्ये अर्धशतक ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला.
वृद्धिमान साहा
सलामीला फलंदाजीसाठी आलेला यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने आपल्या कर्णधारासह शानदार खेळी केली. जॉनी बेयरस्टोच्या अनुपस्थितीत साहाने सलामीला फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४५ चेंडूंचा सामना करताना ८७ धावा कुटल्या. यामध्ये २ षटकार आणि १२ चौकारांचा समावेश होता. पहिल्या विकेटसाठी वॉर्नर आणि साहाने १०७ धावांची धमाकेदार शतकी भागीदारी रचली.
मनीष पांडे
साहाची विकेट पडल्यानंतर मनीष पांडे फलंदाजीला आला. त्यानेही अफलातून खेळी करत ३१ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ४ चौकारही ठोकले.
राशिद खान
आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खानने या सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या गोलंदाजीने ४ षटकात केवळ ७ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. यादरम्यान त्याने अजिंक्य रहाणे, शिमरॉन हेटमायर आणि अक्षर पटेलची विकेट घेतली.
संदीप शर्मा
वेगवान गोलंदाज संदीप शर्मानेही या सामन्यात उत्तम कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २७ धावा देत २ विकेट्स चटकावल्या. त्याने मागील दोन सामन्यात सलग शतके ठोकणाऱ्या शिखर धवनची महत्त्वपूर्ण विकेट घेत त्याला शून्य धावेवर पव्हेलियनमध्ये धाडले. याव्यितिरिक्त त्याने रिषभ पंतचीही विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
-“आर्चरने तिसरे षटक फेकले असते तर…”, राजस्थानविरुद्धच्या दमदार खेळीनंतर मनीष पांडेची प्रतिक्रिया
-छा गये पांडेजी ! राजस्थानविरुद्धच्या दमदार खेळीनंतर ट्विटरवर मनीष पांडेच्याच नावाचा कल्ला