आयपीएल 2020 चा हंगाम जवळपास शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. अशात प्रत्येक संघाने आपले 14 सामने संपवून उत्तम खेळ केला आहे. परंतु यादरम्यान काही संघांनी त्यांच्या संघात असलेल्या काही दिग्गज खेळाडूंना मात्र एकही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही.
आयपीएलच्या या स्पर्धेत बऱ्याच संघांनी काही खेळाडूंवर विश्वास दाखवला नाही. यात ख्रिस गेलचेदेखील नाव समाविष्ट होईल. पंजाबच्या संघाने सुरुवातीचे बरेच सामने त्याला संधी दिली नव्हती. परंतु मिळालेल्या संधी नंतर त्याने जबरदस्त कामगिरी करून दाखवली. मुंबईनेदेखील स्पर्धेच्या मधोमध पोहोचल्यानंतर नेथन कुल्टर नाईलला खेळण्याची संधी दिली होती. परंतु असेही अनेक खेळाडू आहेत ज्यांना शेवटपर्यंत संधी मिळालीच नाही. असे 5 खेळाडू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1. मनन वोहरा
हे नाव तर अनेकांच्याच परिचयाचे आहे. 2014 च्या आयपीएल पदार्पणात त्याने 324 धावा केल्या होत्या. वरच्या फळीत खेळण्यासाठी तो एक उत्तम पर्याय आहे. मनन वोहरा 2020 साठी राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला. मात्र संघाने त्याला एकही सामन्यात संधी दिली नाही. राजस्थानकडून खेळताना यशस्वी जयस्वाल आणि रॉबिन उथप्पा हे दोघेही खराब कामगिरी करत असतानाही मनन वोहराला संधी न देणे म्हणजे एका अर्थी त्याच्यावर अविश्वास दाखवणेच.
2. ईशान पोरेल
किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ईशान पोरेल या युवा खेळाडूला लिलावातून संघात घेतले होते. ईशानने 2018 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. याशिवाय त्याला भारत ‘अ’ कडून खेळण्याचा देखील अनुभव होता. पंजाबच्या संघाने अर्शदीप सिंग आणि रवी बिष्णोईसारख्या युवा गोलंदाजांना संधी दिली ज्याचा फायदा त्यांनी घेतला. मात्र पंजाबने अशीच एक संधी ईशान पोरेलसारख्या युवा गोलंदाजालादेखील द्यायला हवी होती.
3. संदीप लामिछाने
नेपाळ संघाकडून खेळणारा संदीप लामिछाने हा जगभरात टी-20 क्रिकेट खेळत असून तो एक चमकदार कामगिरी करणारा युवा गोलंदाज आहे. 2018 साली त्याने आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. यादरम्यान त्याने 9 सामन्यांत 13 बळी घेतले आहेत. संदीप दिल्लीच्या संघात असून दिल्लीनं अद्यापही त्याला संधी दिलेली नाही. अक्षर पटेल आणि आर अश्विनसारख्या अनुभवी गोलंदाजांना संघ सर्वाधिक खेळण्याची संधी देत असून अजूनही संदीप बाबत विचार केला जात नाहीये. दिल्लीचा पुढील सामना गुरुवारी मुंबई विरोधात होणार आहे. यात संदीप खेळताना दिसला तर नवलच.
4. विराट सिंग
आयपीएल 2020 च्या हंगामासाठी हैद्राबादच्या संघाने विराट सिंग या युवा खेळाडूला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. मधल्या फळीत फलंदाजी करताना विराट उत्तम खेळ करतो. हैद्राबाद संघ शुक्रवारी बेंगलोर विरोधात मैदानात उतरणार आहे. या सामन्यात त्याला जागा मिळण्याची खूप कमी शक्यता आहे. हैद्राबादने आपल्या संघात अभिषेक शर्मा, अब्दुल समद आणि प्रियम गर्ग या युवा खेळाडूंना अनेक सामने खेळण्यास दिले. परंतु विराट सिंगला मात्र अध्याप आयपीएल पदार्पणापासून दूर ठेवले आहे.
5. ख्रिस लिन
ऑस्ट्रेलियाचा धुव्वादार खेळाडू ख्रिस लिनला एकाही सामन्यात संधी न मिळणे म्हणजे नवलच म्हणावे लागेल. मागील वर्षी कोलकाता संघाकडून खेळणारा लिन या वर्षीपासून मुंबईच्या संघात सामील झाला. पहिल्या सामन्यात तो नक्कीच फलंदाजी करताना दिसेल असा सर्वांना विश्वास होता. काहींच्या मते तो सलामीला येईल तर काहींच्या मते तो तिसऱ्या क्रमांकावर खेळ करेन असा समज होता. मात्र मुंबईने आपल्या जुन्याच क्रमाने खेळ सुरू ठेवला. शेवटच्या काही सामन्यांत रोहित शर्माला दुखापत झाल्याने तो बाहेर बसला होता. आता त्याच्या जागी ख्रिस लिन खेळणार असे जाणकारांना वाटू लागले. मात्र या ही परिस्थितीत मुंबईने त्याला संधी दिली नाही. अशात मुंबईसाठी त्याने अद्याप एकही सामना खेळलेला नाही.
ट्रेंडिंग लेख-
-हैदराबादची प्ले ऑफमध्ये दिमाखात एन्ट्री; ‘या’ ३ कारणांमुळे मुंबईचा दारुण पराभव
-वनडेत १७४ चेंडूत नाबाद ३६ धावा करणाऱ्या गावसकरांनी एकदा सेहवाग स्टाईल केली होती गोलंदाजांची धुलाई
-आर्थिक तंगीमुळे एकेवेळी प्लंबिंग व्हॅन चालणारा क्रिकेटर पुढे वेगाचा बादशाह झाला…
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात बदल, रोहितला मिळणार संधी?
-नाडाने घेतले केएल राहुल- रवींद्र जडेजाचे नमुने; जाणून घ्या कारण