---Advertisement---

एकच फाईट !! ‘हा’ पट्ट्या ठरला आयपीएलच्या अंतिम सामन्यात ‘मॅचविनर प्लेअर’

On: बुधवार, नोव्हेंबर 11, 2020 2:44 PM
---Advertisement---

बऱ्याच अडथळ्यांचा सामना करून, यूएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा विजेता मंगळवारी(१० नोव्हेंबर) रात्री ठरला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारत विजेतेपद आपल्या नावे केले. मुंबईने या हंगामाचे विजेतेपद पटकावत विक्रमी पाचव्यांदा आयपीएल जिंकण्याची किमया केली. मुंबईसाठी अंतिम सामन्याचा शिल्पकार ठरला तो डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बोल्टने मागील दोन हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले होते.

मंगळवारी रात्री संपन्न झालेल्या आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना सात बाद १५७ धावा काढल्या. दिल्लीसाठी कर्णधार श्रेयस अय्यर व यष्टीरक्षक रिषभ पंत यांनी अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आक्रमक अर्धशतक झळकावून सामना एकतर्फी बनवला. अखेरीस आठ चेंडू व पाच गडी राखून मुंबईने विजय साजरा केला. अंतिम सामन्याचा सामनावीर तीन बळी मिळवणारा मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट ठरला. स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बोल्ट २५ बळींसह तिसर्‍या स्थानी राहिला. त्याच्यापेक्षा जास्त बळी फक्त कागिसो रबाडा व जसप्रीत बुमराह यांनीच मिळवले.

बोल्टने केली अंतिम सामन्याची सनसनाटी सुरुवात

अंतिम सामन्यातील पहिले षटक टाकताना, बोल्टने मुंबई इंडियन्सला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्याने पहिल्याच चेंडूवर दिल्लीचा सलामीवीर मार्कस स्टॉयनिसला यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केले. त्यानंतर सामन्यातील तिसऱ्या व वैयक्तिक दुसऱ्या षटकात त्याने अजिंक्य रहाणेला तंबूत पाठवले. बोल्टने सुरुवातीचे धक्के देत, दिल्लीच्या फलंदाजांवर दबाव आणला होता. आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये १८ व्या षटकात शिमरॉन हेटमायरला बाद करत,‌ स्वतःच्या खात्यात तीन बळी जमा केले. अंतिम सामन्यात बोल्टच्या गोलंदाजीचे पृथक्करण ४-०-३०-३ असे होते.

चार सामन्यात दिल्लीचे ९ फलंदाज केले गारद

आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स चार वेळा एकमेकांसमोर आले. या चारही सामन्यात मुंबईने दिल्लीला पराभूत केले. बोल्टने या चारही सामन्यात दिल्लीच्या ९ फलंदाजांना माघारी धाडण्याचे कामगिरी केली. विशेष म्हणजे बोल्टने या चार सामन्यात प्रत्येक वेळी पहिल्या षटकात दिल्लीच्या एकातरी फलंदाजाला बाद केले होते. बोल्टची २०२० आयपीएलमधील दिल्ली विरुद्धची एकूण गोलंदाजी आकडेवारी १४-०-९६-९ अशी दिमाखदार राहिली.

अपमानाचा घेतला बदला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणारा बोल्ट २०१८ व २०१९ या हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठीच खेळत होता. २०१८ मध्ये त्याने दिल्लीसाठी सर्वाधिक १८ बळी देखील मिळवले होते. मात्र, २०१९ आयपीएलवेळी कागिसो रबाडाच्या येण्याने त्याला नियमित संधी मिळाली नाही. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘ट्रेडींग विंडो’ द्वारे तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला. या ट्रेडींगमुळे बोल्टसारख्या नामवंत गोलंदाजाचा एकप्रकारे अपमान झाला होता. या अपमानाचा बदला बोल्टने आपल्या कामगिरीतून घेतला.

महत्त्वाच्या बातम्या –

स्पर्धेअखेर संघ आणि खेळाडू मालामाल; पाहा कुणाला किती रक्कम मिळाली

पिछा ना छोडेंगे! चेन्नईनंतर ‘हा’ मोठा किर्तीमान मिळवणारा मुंबई दुसराच संघ 

मुंबईचे ५ पांडव! संघाला चॅम्पियन बनवण्यात ‘या’ पाच खेळाडूंनी निभावली मोलाची कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---