नुकतीच या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी, वनडे आणि टी२० संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात एकाही संघात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला फीटनेसचे कारण देत स्थान देण्यात आले नाही. परंतु आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने रोहितचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित नेट्समध्ये पूर्वीप्रमाणे मोठ- मोठे फटके मारताना दिसत आहे. त्यामुळे निवडकर्त्यांनाही रोहितने एकप्रकारे प्रत्युत्तर दिले आहे. रोहित फीट असूनही त्याला भारतीय संघात स्थान का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयपीएल २०२० मध्ये दुखापतीमुळे खेळला नाही सामने
मुंबई इंडियन्स संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे आयपीएलच्या मागील काही सामन्यात खेळला नाही. परंतु येत्या प्लेऑफ सामन्यांमध्ये तो खेळताना दिसेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे रोहित नेटमध्ये सराव करताना दिसत आहे. मुंबईने शेअर केलेला रोहितचा व्हिडिओ पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
On a Ro-ll in the nets ????#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @ImRo45 pic.twitter.com/phqdGhFE4c
— Mumbai Indians (@mipaltan) November 2, 2020
रवी शास्त्रींनी केले होते वक्तव्य
मागील काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी रोहितबद्दल मोठे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, रोहितला आपल्या दुखापतीवर गंभीरतेने विचार करावा लागेल. त्याने पुनरागमन करण्यासाठी घाई केली नाही पाहिजे. याव्यतिरिक्त रोहितच्या मेडिकल टीमने त्याला पुन्हा एकदा दुखापतग्रस्त होण्याचा धोका सांगितला आहे.
शास्त्रींनी म्हटले की, निवडकर्त्यांनी रोहितची दुखापत गंभीरतेने घेतल्यानंतरच त्याला संघातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित प्लेऑफच्या सामन्यात खेळण्याची अपेक्षा
आयपीएल २०२० च्या प्लेऑफचा पहिला सामना ५ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. ३ नोव्हेंबरला होणाऱ्या साखळी सामन्यात रोहित खेळला, तर त्याच्या दुखापतीबाबत स्पष्ट होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, प्लेऑफच्या सामन्यातच रोहितला मुंबई संघात सामील केले जाईल.
इतकेच नाही तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर कायरन पोलार्डने रोहितबद्दल म्हटले की, रोहित लवकरच स्पर्धेत पुनरागमन करेल. तो बरा होत आहे.
आयपीएल २०२० मधील रोहितची कामगिरी
रोहितने आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने २६० धावा केल्या आहेत.
मुंबईची प्लेऑफमध्ये एन्ट्री
आयपीएल २०२० मध्ये प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सने एन्ट्री केली आहे. त्यांनी आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत. यात त्यांनी ९ सामन्यात विजय मिळवला, तर उर्वरित ४ सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यांचा शेवटचा साखळी सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहित शर्मा कधी करणार पुनरागमन? पाहा पोलार्ड काय म्हणतोय
-रोहित शर्माने सुर्यकुमारची प्रतिभा ९ वर्षांपूर्वीच जाणली होती? व्हायरल होतोय ट्विट
ट्रेंडिंग लेख-
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?






