आयपीएल २०२० चा दुसरा क्वॉलिफायर सामना अबु धाबीत रविवारी (८ नोव्हेंबर) झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. या सामन्यात दिल्लीने हैदराबादला पराभवाचं पाणी पाजत १७ धावांनी विजय मिळवला आणि पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. दिल्लीच्या विजयात मार्कस स्टॉयनिस आणि कागिसो रबाडा या खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. स्टॉयनिसने केलेल्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नाणेफेक जिंकत दिल्ली संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ३ विकेट्स गमावत १८९ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग हैदराबाद सहज पूर्ण करेल असे वाटत होते. परंतु हैदराबाद संघाला ८ विकेट्स गमावत केवळ १७२ धावाच करता आल्या.
हैदराबाद संघाकडून फलंदाजी करताना धडाकेबाज फलंदाज केन विलियम्सनने दमदार खेळी केली. त्याने ४५ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६७ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्यासोबतच अब्दुल समदनेही ३३ धावांचे योगदान दिले, तर मनीष पांडेला केवळ २१ धावा करता आल्या. हैदराबादच्या इतर फलंदाजांना २० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. यामध्ये कर्णधार डेविड वॉर्नरचाही समावेश आहे. त्याने केवळ २ धावा करत तंबूचा रस्ता धरला.
दिल्लीकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २९ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्यासोबतच मार्कस स्टॉयनिसनेही अफलातून गोलंदाजी केली. त्याने ३ षटके गोलंदाजी करताना २६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून ‘गब्बर’ नावाने ओळखला जाणारा फलंदाज शिखर धवनने दमदार खेळी केली. त्याने ५० चेंडूत ७८ धावा केल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ६ चौकार ठोकले. त्याच्यासोबतच शिमरॉन हेटमायरने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले. या सामन्यात सलामीला फलंदाजीस आलेला मार्कस स्टॉयनिसने ३८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर कर्णधार श्रेयस अय्यरनेही २१ धावांचे योगदान दिले.
हैदराबादकडून गोलंदाजी करताना संदीप शर्मा, राशिद खान आणि जेसन होल्डर या गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
या विजयासह दिल्ली संघाने आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. येत्या मंगळवारी (१० नोव्हेंबर) दुबईत दिल्ली संघ मुंबई इंडियन्सचा अंतिम सामन्यात सामना करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर
-RCB आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराटने बदललं वास्तव्य; पाहा काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
-RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा