सध्या कोरोना व्हायरसचा धोका पहाता आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेे आहे. यादरम्यान बंद दारामागे म्हणजेच प्रेक्षकांव्यतिरिक्त स्पर्धा भरवण्याचीही चर्चा होती. तसेच जर आयपीएलचे आयोजन उशीरा जरी करायचे म्हटले तरी कोणत्या देशाचे खेळाडू उपलब्ध होऊ शकतात कोणते नाही, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.
तसेच जरी परदेशी खेळाडूंशिवाय आयपीएलचे आयोजन करण्याचा निर्णय झाला तरी अनेक गोष्टीचांही विचार करावा लागेल. तसेच जर असे झाले तर प्रत्येक संघाला परदेशी खेळाडूंशिवाय फक्त भारतीय खेळाडूंसह ११ जणांचा संघ तयार करण्याचे आव्हान असेल.
जर असा विचार करायचा झाला तर ३ वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सची अशी असू शकते परदेशी खेळाडूंव्यतिरिक्त ड्रिम ११ संघ –
सलामीवीर – मुरली विजय आणि ऋतुराज गायकवाड
मुरली विजय आयपीएलच्या सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याने चेन्नईकडून आत्तापर्यंत ७ मोसम खेळले आहेत. तसेच चेन्नईकडून खेळताना त्याने २ शतकेही झळकावली आहे. त्याने चेन्नईकडून खेळताना ८६ सामन्यात २६.५० च्या सरासरीने २१७३ धावा केल्या आहेत. त्यामुळे चेन्नईकडे त्याच्यारुपाने सलामीवीरासाठी चांगला पर्याय आहे.
सलामीला मुरलीला २३ वर्षीय ऋतुराज गायकवाडची चांगली साथ मिळू शकते. गायकवाड मागील २ मोसमापासून चेन्नईच्या संघात आहे. पण त्याला अजून सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. परंतू त्याने भारत अ संघाकडून खेळताना बऱ्याचदा चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे तोही एक चांगला पर्याय आहे.
मधली फळी – सुरेश रैना, अंबाती रायुडु आणि केदार जाधव
चेन्नईकडे मधल्या फळीसाठी अनेक अनुभवी भारतीय खेळाडूंचा पर्याय आहे. यात सुरेश रैना, अंबाती रायुडु आणि केदार जाधव आहेत. हे तिघेही बऱ्याच काळापासून चेन्नईकडून खेळत आहे. तसेच या तिघांनाही राष्ट्रीय संघात खेळण्याचाही अनुभव आहे.
रैना चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत १८८ सामन्यात ५३६९ धावा चेन्नईकडून खेळताना केल्या आहेत. चेन्नईकडून ५ हजारांहून अधिक गावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
तसेच अंबाती रायुडुनेही आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्सकडून ३३ सामने खेळले आहेत. यात त्याने ३४ च्या सरासरीने ८८४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर केदार जाधव २०१८ ला चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झाला. २०१८ ला त्याला पहिल्याच सामन्यात दुखापत झाल्याने संपुर्ण मोसमात खेळता आले नाही. तसेच २०१९ च्या मोसमातही त्याला शेवटच्या टप्प्यात दुखापत झाली होती.
पण असे असले तरी त्याला एकूण १५ सामने चेन्नईकडून खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने १८६ धावा केल्या आहेत. त्याची कामगिरी खूप काही खास झाली नसली तरी त्याला अनुभव असल्याने त्याचा फायदा चेन्नईला होऊ शकतो.
यष्टीरक्षक – एमएस धोनी (कर्णधार)
चेन्नईचा पहिल्या मोसमापासूनचा कर्णधार एमएस धोनी हा चेन्नई संघाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली चेन्नईने ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच तो सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाराही फलंदाज आहे. त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणाराही यष्टीरक्षक आहे. त्याने आयपीएलमध्ये १९० सामन्यात १३२ विकेट्स यष्टीमागे घेतल्या आहेत. तसेच धोनीने चेन्नईकडून १८४ सामने खेळले असून त्याने ४३०७ धावा केल्या आहेत. तो रैनानंतर चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
अष्टपैलू क्रिकेटपटू – रविंद्र जडेजा आणि पियुष चावला
रविंद्र जडेजा २०१२ पासून चेन्नईकडून खेळत आहे. तसेच तो चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या फिरकी गोलंदाजीबरोबरच तळातली फलंदाजी चेेन्नईसाठी फायद्याची आहे. त्याने आत्तापर्यंत चेन्नईकडून ११६ सामने खेळले असून यात त्याने २१.७२ च्या सरासरीने १०२१ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ९० विकेट्सही घेतल्या आहेत.
पियुष चावलाचा २०२० आयपीएलसाठी पहिल्यांदाच चेन्नई संघात समावेश झाला आहे. पण याआधी चावलाने आयपीएलमध्ये खेळताना अनेकदा चांगली अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १५७ सामने खेळला आहे. तसेच तो जरी प्रामुख्याने गोलंदाज असला तरी अनेकदा त्याने चांगली फलंदाजी प्रदर्शनही केले आहे. त्याने ५८४ धावा केल्या आहेत.
तसेच त्याने १५० विकेट्सही घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावरही आहे. जडेजा आणि चावला चेन्नई संघात असल्याने चेन्नईला चांगल्या फीरकी गोलंदाजांसह तळात फलंदाजी करण्यासाठी चांगले पर्याय आहे.
गोलंदाज – शार्दुल ठाकूर, दिपक चाहर आणि हरभजन सिंग
शार्दुल ठाकूर आणि दिपक चाहर हे दोन वेगवान गोलंदाज मागील २ मोसमापासून चेन्नईच्या गोलंदाजी फळीतील नियमित सदस्य राहिले आहेत. शार्दुलने मागील २ मोसमात चेन्नईकडून २३ सामने खेळले असून २४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच दिपकने २९ सामने चेन्नईकडून खेळताना ३२ विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबरच चेन्नईकडे हरभजन सिंगच्या रुपात अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. हरभजनने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये अनेकदा मोठी कामगिरी केली आहे. तो २०१७ पर्यंत मुंंबई इंडियन्सकडून खेळला तर २०१८ पासून तो चेन्नईकडून खेळत आहे. त्याने चेन्नईकडून २४ सामने खेळताना २३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच एकूण आयपीएलमध्ये त्याने १६० सामन्यात १५० विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
एकेकाळी होते विराटचे संघसहकारी, आज कुणालाही त्यांचं नावही आठवत नाही
जर गल्ली क्रिकेट खेळला असला तर तुम्हाला शंभर टक्के माहित असणार हे २० नियम
१ जानेवारी २०१५ रोजी आयसीसी क्रमवारीत टाॅप १०मध्ये असलेले खेळाडू आज मात्र