इंडियन प्रीमियर लीगचे आतापर्यंत १२ हंगाम झालेले आहेत. या १२ हंगामांदरम्यान आयपीएलने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. केवळ युवा खेळाडूच नव्हे तर अनेक दिग्गज खेळाडूंचाही आयपीएलमध्ये सहभाग असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आयपीएलमधील सामन्यांची रोमांचकता अधिक वाढते. कदाचित या सर्व गोष्टींमुळेच, आयपीएल आज जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी२० लीग आहे.
आयपीएलमध्ये जेवढे खेळाडूंचे महत्त्व असते, तेवढेच सर्व संघांच्या प्रशिक्षकांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचेही असते. त्यामुळे आयपीएलच्या प्रशिक्षकांचा आणि मार्गदर्शकांचा मिळून प्लेइंग इलेव्हन संघ तयार करण्यात आला आहे. IPL 2020 Support Staff Best Playing XI
सलामीवीर फलंदाज
ब्रेंडन मॅक्युलम आणि स्टीफन फ्लेमिंग
स्टीफन फ्लेमिंग हा आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा प्रशिक्षक आहे. त्याच्या प्रशिक्षणामुळे चेन्नई आज आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. स्टीफन हा त्याच्या काळातील न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत आयपीएलमध्ये १० सामन्यात १९६ धावा केल्या होत्या. त्यामुळे स्टीफनला सलामीला फलंदाजी करण्यासाठी निवडण्यात आले आहे.
ब्रेंडन मॅक्युलम हा कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. आयपीएल २०२०मध्येच त्याची नव्याने मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. मॅक्युलमने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात खूप दमदार केली होती. त्याने त्याच्या पहिल्या सामन्यातच १५८ धावांनी तूफान खेळी केली होती. १० वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत १०९ सामन्यात २८८० धावा करणाऱ्या मॅक्युलमवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मधल्या फळीतील फलंदाज
रिकी पाँटिंग, सचिन तेंडुलकर, व्हिव्हिएस लक्ष्मण, मोहम्मद कैफ
मधल्या फळीतील फलंदाज म्हणून रिकी पाँटिंग, सचिन तेंडुलकर, व्हिव्हिएस लक्ष्मण आणि मोहम्मद कैफ यांची निवड करण्यात आली आहे. पाँटिंग हा सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याने आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्त्वही केले होते. तर, सचिन हा मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्याचे आयपीएलमधील प्रदर्शन जबरदस्त होते.
तर, सनराइजर्स हैद्राबादचा मार्गदर्शक व्हिव्हिएस लक्ष्मणलाही या संघात निवडण्यात आले आहे. कैफ हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा सह प्रशिक्षक आहे आणि तो खालच्या फळीत फलंदाजी करण्यासाठी उपयुक्त फलंदाज ठरु शकतो.
फिरकी गोलंदाज
अनिल कुंबळे आणि साईराज बहुतुले
भारताचा माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे हा किंग्स इलेव्हन पंजाबचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याने आयपीएलमध्ये ४२ सामन्यात ४५ विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधारही होता. कुंबळे हा प्लेइंग इलेव्हन संघातील महत्त्वाचा गोलंदाज असेल.
साईराज बहुतुलेबाबतीत पाहायचे झाले तर त्याने आयपीएल खेळलेले नाही. तसेच त्याचे भारतीय संघातील प्रदर्शनही जास्त चांगले नव्हते. त्याने भारताकडून केवळ २ कसोटी आणि ८ वनडे सामने खेळले होते. तरी, बहुतुलेचे प्रथम श्रेणीतील गोलंदाजी प्रदर्शन दर्शवते की तो दमदार गोलंदाज होता. त्याने प्रथम श्रेणीत १८८ सामन्यात एकूण ६३० विकेट्स घेतल्या होत्या. तो आता राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आहे. त्यामुळे बहुतुले हा संघातील खालच्या फळीतील फलंदाज आणि फिरकीपटूही ठरु शकतो.
वेगवान गोलंदाज
लक्ष्मिपती बालाजी, झहीर खान आणि शेन बॉन्ड
चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मिपती बालाजी, मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट ऑपरेशनचे संचालक झहीर खान आणि मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड हे संघातील ३ प्रमुख वेगवान गोलंदाज असतील.
बालाजीने आयपीएलमध्ये ७३ सामन्यात ७६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर आयपीएल इतिहासामध्ये पहिली हॅट्रिक घेण्याच्या विक्रमाची नोंद आहे. तो चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला होता.
झहीर खानने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १०० सामन्यात १०२ विकेट्स घेतल्या होत्या. १७ धावा देत ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी होती. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळला होता.
तसेच, शेन बॉन्ड हादेखील न्यूझीलंडचा दमदार गोलंदाज होता. त्याने आयपीएलमध्ये ८ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
केवळ ८ वर्षांचा असल्यापासून ‘या’ खेळाडूला सचिन करतोय मार्गदर्शन, आज आहे टीम इंडियाचा स्टार
जर केविन पीटरसनचे ‘ते’ म्हणणे खरे ठरले, तर धोनी खेळू शकतो…
‘आयपीएलमधील तो क्षण स्वप्न पूर्ण करणारा होता’