नवी दिल्ली । भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. असे असले तरी तो क्रिकेटशी जोडलेला आहे. सचिन सातत्याने युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत असतो. सचिनबद्दल बोलताना युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने म्हटले की, सचिनने त्याच्याबरोबर अनेक वेळा चर्चा केली आहे. ज्यामध्ये ते तांत्रिक पैलूंच्या ऐवजी फलंदाजाच्या मानसिक पैलूंवर अधिक भर देतात.
आठ वर्षांच्या वयापासून सचिन करतोय शॉला मार्गदर्शन-
‘इंंडियन ऑयल’बरोबर इंस्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान शॉ (Prithvi Shaw) म्हणाला की, “मी सचिन सरांना जेव्हा भेटलो होतो, त्यावेळी मी केवळ ८ वर्षांचा होतो. तेव्हापासूनच ते माझे मार्गदर्शक आहेत. मी त्यांच्याकडून मैदानावर आणि मैदानाच्या बाहेर शिस्तीशिवाय इतर बऱ्याच गोष्टी शिकलो आहे.”
सचिन (Sachin Tendulkar) सध्याही आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सराव करतो, याचा शॉला आनंद आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध राजकोट येथील आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक करणारा शॉ म्हणाला की, “जेव्हा मी सराव करत असतो, तेव्हा जर सचिन सर तिथे असतील तर ते मला तांत्रिक पैलूंच्या ऐवजी मानसिक पैलूंबद्दल सांगतात. सचिन सर आणि इतर प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली माझा आतापर्यंतचा प्रवास अप्रतिम राहिला आहे.”
कारकीर्दीची शानदार सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर शॉला दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो संघाबाहेर गेला होता . यानंतर डोपिंग प्रकरणात फसल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. नुकतेच सचिनने पीटीआयबरोबर एका मुलाखतीत म्हटले होते की, त्याने शॉबरोबर मैदानात आणि मैदानाबाहेरील गोष्टींबद्दल चर्चा केली होती.
शॉने भारतीय संघाकडून आतापर्यंत ४ कसोटी सामने आणि ३ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ५५.८३ च्या सरासरीने ३३५ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच वनडेत त्याने २८ च्या सरासरीने ८४ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! जूलैमध्ये होऊ शकते ही कसोटी मालिका
-धोनीची एक चूक नडली आणि मुंबई झाली होती आयपीएल चॅंम्पियन
-सानिया मिर्झा म्हणते, शोएब मलिकची ही गोष्ट अजिबात आवडत नाही