क्रिकेटच्या खेळात कोणत्याही संघाच्या यशात खेळाडूंच्या कामगिरीसोबतच कर्णधाराचे योगदान देखील महत्वाचे असते. कारण, संघाचा कर्णधार चांगला असेल तर सर्वोत्तम रणनीती आणि खेळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अचूक निर्णयांनी तो आपल्या संघाला विजयी बनवू शकतो.
संघाचा कर्णधार चांगला नसेल तर त्या संघाला विजय मिळवण्यात अडचणी येतात. आयपीएलमध्ये असे बरेच खेळाडू आहेत, ज्यांनी एक खेळाडू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्याबरोबरच त्यांनी कर्णधार म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. प्रत्येक संघात असे अनेक खेळाडू असतात, ज्यांच्याकडे कर्णधारपद किंवा उपकर्णधारपद नसले तरी ते संघाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
असे खेळाडू गरज भासल्यास आपल्या अनुभवाद्वारे कर्णधार व उपकर्णधारा व्यतिरिक्त पर्यायी कर्णधाराची भूमिका पार पडत असलेले दिसतात. आज प्रत्येक आयपीएल संघाच्या अशाच पर्यायी कर्णधारांविषयी आपण जाऊन घेऊया.
१) ऍरोन फिंच, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
आत्तापर्यंत एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकू न शकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला यावर्षी विजेतेपद मिळवण्याची चांगली संधी आहे. संघाचे नेतृत्व भारताचा कर्णधार विराट कोहली करत आहे तर उपकर्णधार पदाची जबाबदारी एबी डिव्हिलियर्स सांभाळत आहे.
या दोन खेळाडूं व्यतिरिक्त यावर्षी संघात ऑस्ट्रेलियाच्या ऍरोन फिंचचा समावेश केला गेला आहे. कोहली, डिव्हिलियर्स यांच्याव्यतिरिक्त फिंच पर्यायी कर्णधारासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. फिंच तीन वर्षापासून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाचा नियमित कर्णधार आहे. यापूर्वी २०१३ आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडियाचे कर्णधारपद देखील फिंचने भूषवले आहे.
२) अजिंक्य रहाणे, दिल्ली कॅपिटल्स
गेली अनेक वर्ष आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केलेला अनुभवी भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे यावर्षी दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल झाला आहे. दोन वर्षापासून दिल्ली संघाची कमान युवा श्रेयस अय्यरच्या हाती आहे. उपकर्णधार रिषभ पंत हादेखील खूप तरुण आहे. यावर्षी दिल्लीने आर अश्विन व अजिंक्य रहाणे या अनुभवी खेळाडूंचा समावेश आपल्या संघात केला आहे.
श्रेयस व रिषभ यांच्यानंतर अजिंक्य रहाणे दिल्ली कॅपिटल्सचा पर्यायी कर्णधार बनू शकतो. अजिंक्यने २०१८ चा पूर्ण हंगाम राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते. त्यावर्षी राजस्थानने प्ले-ऑफ्स पर्यंत पोहोचण्याची कामगिरी केली होती. २०१९ हंगामाच्या मध्यात खराब कामगिरीमुळे अजिंक्यला राजस्थानच्या कर्णधारपदावरून काढण्यात आले होते. तरीही, गरज भासल्यास अजिंक्य दिल्लीचे नेतृत्व करू शकतो. सध्या अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे.
३) केन विल्यमसन, सनरायझर्स हैदराबाद
२०१६ आयपीएलचा विजेता असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्या खांद्यावर आहे. उपकर्णधार म्हणून भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार काम पाहतो. या दोघांव्यतिरिक्त संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत जे पर्यायी कर्णधार होऊ शकतात.
वॉर्नर व भुवनेश्वर यांच्याऐवजी पर्यायी कर्णधारपदासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे तो म्हणजे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन. २०१८ च्या आयपीएल हंगामात डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थित विल्यमसनने सनरायझर्स हैदराबादला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. कर्णधार व प्रमुख फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी त्याने पार पाडली होती. याचसोबत, २०१९ क्रिकेट विश्वचषकात न्यूझीलंडला त्याने अंतिम फेरीत पोहोचवले होते. कर्णधारपदाचा दांडगा अनुभव असल्याने तो हैदराबादच्या नेतृत्व गटाचा सदस्य राहील.
४) ओएन मॉर्गन, कोलकाता नाईट रायडर्स
२०११-२०१७ अशी सात वर्ष गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघ चांगलाच मजबूत झाला होता. २०१२ व २०१४ या आयपीएल हंगामात कोलकाताने आयपीएलची विजेतेपदे मिळवली होती. गेल्या दोन वर्षापासून नवीन कर्णधार दिनेश कार्तिक याच्या नेतृत्वात कोलकाता तितकी चांगली कामगिरी करू शकला नाही. यावर्षी, दिनेश कार्तिकच्या सोबतीला युवा शुबमन गिलला नेतृत्व गटात सामील करण्यात आले आहे. या दोघांव्यतिरिक्त इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा कर्णधार ओएन मॉर्गन हा देखील संघात दाखल झाला आहे.
मॉर्गनने आपल्या नेतृत्वात इंग्लंडला २०१९ क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडचा कर्णधार आहे. दिनेश कार्तिकच्या अनुपस्थितीत मॉर्गन केकेआरचे कर्णधारपद सांभाळू शकतो.
५) ग्लेन मॅक्सवेल, किंग्ज इलेव्हन पंजाब
आरसीबी व दिल्ली कॅपिटल्स व्यतिरिक्त आयपीएल विजेतेपद मिळू न शकलेला तिसरा संघ म्हणजे किंग्ज इलेव्हन पंजाब. २०१४ आयपीएल हंगाम वगळता पंजाबचा संघ दरवेळी आयपीएलमध्ये अयशस्वी ठरला आहे. यावर्षी संघाचे नेतृत्व भारताचा केएल राहुल करत आहे.
२०१४ चा आयपीएल हंगाम गाजवलेला ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल दोन वर्षानंतर पुन्हा पंजाबचा संघात दाखल झाला. मॅक्सवेलने याआधी देखील पंजाब संघाचे नेतृत्व केले आहे. राहुल व्यतिरिक्त पंजाबकडे कर्णधारपदासाठी इतके सक्षम पर्याय नाहीत. त्यामुळे राहुलच्या अनुपस्थित मॅक्सवेल पंजाबचे नेतृत्व करू शकतो.
६) संजू सॅमसन, राजस्थान रॉयल्स
आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळविल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ पुन्हा अंतिम फेरीपर्यंत देखील पोहोचू शकला नाही. संघाची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी संमिश्र राहिली आहे. शेन वॉर्न, राहुल द्रविड, शेन वॉटसन व अजिंक्य रहाणे यांसारख्या दिग्गजांनी राजस्थानचे नेतृत्व केलेले आहे. यावर्षी संघाची कमान ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथच्या हाती आहे. स्मिथ तीन वर्ष ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. २०१७ आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट स्मिथच्या नेतृत्वात अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते.
स्मिथशिवाय राजस्थान संघात जोस बटलर, बेन स्टोक्स, डेव्हिड मिलर, रॉबिन उथप्पा व जयदेव उनाडकत सारखे आंतरराष्ट्रीय सितारे आहेत. मात्र, कायम युवा खेळाडूंमध्ये गुंतवणूक करणारे राजस्थान व्यवस्थापन पर्यायी कर्णधार म्हणून युवा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन यांची निवड करू शकतात. संजू गेली ७ वर्ष राजस्थान संघाचा आधारस्तंभ आहे. केरळ संघाचा कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. भविष्याचा विचार करता राजस्थान रॉयल्स काही सामन्यात सॅमसनकडे संघाचे नेतृत्व देतील.
६) रवींद्र जडेजा, चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून एमएस धोनी व्यतिरिक्त कोणते दुसरे नावही समोर येत नाही. धोनीने आपल्या कुशल नेतृत्वच्या जोरावर आयपीएलच्या प्रत्येक हंगामात चेन्नईला प्ले-ऑफ्सपर्यंत नेले आहे. धोनीच्याच नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.
धोनीसोबतच सुरेश रैनाने अनेक वर्ष चेन्नईचे उपकर्णधारपद सांभाळले आहे. आता हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. धोनी जास्तीत जास्त दोन आयपीएल हंगाम खेळू शकतो. त्यामुळे, चेन्नई व्यवस्थापन पर्यायी कर्णधाराची चाचपणी सुरू करू शकते. धोनी व रैनाव्यतिरिक्त भारताचा मुख्य अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा चेन्नईचा पर्यायी कर्णधार होऊ शकतो. जडेजाकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा व आयपीएलचा दांडगा अनुभव आहे.
८) क्विंटन डी कॉक, मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने बारा वर्षात चार आयपीएल विजेतेपदे पटकावली आहेत. ही चारही विजेतेपदे रोहित शर्माच्या नेतृत्वात मिळाली आहेत. सध्यातरी रोहितला मुंबई इंडियन्स संघात कर्णधारपदासाठी कोणी स्पर्धेक नाही. रोहितसोबत वेस्टइंडीजचा दिग्गज टी२० खेळाडू कायरन पोलार्ड हा मुंबईचा उपकर्णधार आहे.
रोहित व पोलार्डशिवाय मुंबईचा पर्यायी कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक याची निवड होऊ शकते. डी कॉक सध्या द. आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. आक्रमक सलामवीरासोबत एक कुशल कर्णधार म्हणून डी कॉक आपली छाप पडताना दिसून येत आहे.