मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम पुढील महिन्यात युएईमध्ये सुरू होणार आहे. लीगची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होईल आणि अंतिम सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आपले पहिले विजेतेपद जिंकू शकतो असा अंदाज बांधला जात आहे.
आरसीबीच्या संघात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स सारखे स्फोटक फलंदाज आहेत, परंतु अद्यापही 12 हंगामामध्ये संघाला एकही विजेतेपद मिळवता आले नाही. 2009, 2011 आणि 2016 मध्ये आरसीबीने तीन वेळा आयपीएलच्या अंतिम फेरी गाठल्या. तिन्ही वेळा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले गेले. गेल्या तीन हंगामात म्हणजे 2017, 2018 आणि 2019 मध्ये संघाला खूप संघर्ष करावा लागला. संघ गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर होता. संघात बरीच मोठी नावे आहेत आणि पुन्हा एकदा विराट कोहलीच्या चाहत्यांना त्याचा संघ करिश्मा करेल ही आशा आहे.
आरसीबीकडे कोहली आणि डिव्हिलियर्स व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अॅरॉन फिंच आहे. टी -20 क्रिकेटच्या इतिहासात दोनदा 150 हून अधिक धावा करणारा फिंच एकमेव खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांत, आरसीबी उत्तम संघ निवडण्यात अपयशी ठरत आहे. विशेषत: गोलंदाजी मध्ये.
बरेच लोक आरसीबीच्या फलंदाजी सामर्थ्याविषयी चर्चा करतात. एकेकाळी हा संघ ख्रिस गेल, कोहली आणि डिव्हिलियर्स सारखे फलंदाज एकत्र घेऊन मैदानावर उतरत होता. संघाने 2018 हंगामापूर्वी गेलची साथ सोडली. पण तरीही संघात कोहली आणि डिव्हिलियर्सच्या रूपात जगातील दोन स्फोटक फलंदाज आहेत.
या हंगामात देवदत्तला विराट कोहली अजमावून पाहू शकतो, ज्याने 2019- 20 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 580 धावा केल्या होत्या. याशिवाय संघात अष्टपैलू मोईन अली आणि शिवम दुबे देखील आहेत. शिवम दुबेने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत चमक दाखवली आहे.
विराट कोहली: आरसीबीला यशस्वी करण्यासाठी कर्णधार विराट कोहलीवर मोठी जबाबदार आहे. या हंगामात त्याच्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे उत्कृष्ट कामगिरीबरोबरच संघाला पहिले विजेतेपद मिळवून देणे. तथापि, लॉकडाऊनपूर्वी भारतीय संघाच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय दौर्या दरम्यान तो फ्लॉप ठरला होता. न्यूझीलंडविरुद्ध त्याची बॅट शांत होती. त्याचवेळी जेव्हा जेव्हा आयपीएल परदेशी भूमीवर झाली तेव्हा कोहलीची बॅट शांत राहिली आहे. कोहली हा संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. संघाचे यश त्यांच्यावर अवलंबून आहे.
ख्रिस मॉरिस: ख्रिस मॉरिसला लिलावात 10 कोटी रुपयात विकत घेण्यात आले होते, यावर्षी तो आरसीबीसाठी सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक होता. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो पण गोलंदाज म्हणून संघात त्याचे महत्त्व जास्त आहे. तो डेथ ओव्हर्सचा तज्ञ मानला जातो. बिग बॅश लीग 2019-2020 मध्ये त्याने सिडनी थंडरसाठी शानदार प्रदर्शन केले होते.
एबी डिव्हिलियर्स: एबी डिव्हिलियर्स देखील संघातील सर्वात महत्वाच्या खेळाडूंमध्ये आहे, जो सामना कधीही फिरवू शकतो. प्रत्येकाला त्याच्या स्फोटक फलंदाजीची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देणार्या डिव्हिलियर्सचे आता संपूर्ण लक्ष लीगवर आहे.
डेल स्टेन: संघाच्या गोलंदाजी विभागाकडे पाहता डेल स्टेन हा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. गेल्या हंगामात जखमी नॅथन कुल्टर नाईलची जागा घेण्यासाठी डेल स्टेनला एप्रिलमध्ये आरसीबीमध्ये संघात दाखल झाला होता. संघाने त्याला या हंगामातही राखले होते. मागील हंगामात, तो आरसीबीकडून केवळ दोन सामने खेळू शकला आणि यात त्याने 4 बळी घेतले. 2013 हा हंगाम त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला. त्याने 17 सामन्यात 19 बळी घेतले.
फिंच, कोहली आणि डिव्हिलियर्स हे फलंदाज आरसीबीची ताकद आहेत. फिंच सलामीची जबाबदारी सांभाळू शकतो आणि त्याच्यानंतर कोहली आणि डिव्हिलियर्स आहेत. तथापि, फिंचसह कोहली या हंगामात सलामी येऊ शकतो. त्यामुळे आरसीबीची सलामीची जोडी खूप मजबूत होईल. या अनुभवी खेळाडू व्यतिरिक्त देवदत्त आणि शिवम दुबे यांच्यासारखे तरुण स्फोटक फलंदाज आहेत.