आयपीएल २०२० च्या यशस्वी हंगामानंतर क्रिकेटप्रेमींना आयपीएल २०२१ चे वेध लागले आहेत. मागील काही दिवसांच्या चर्चेनुसार, आयपीएलच्या चौदाव्या हंगामापूर्वी खेळाडूंचा ‘मेगालिलाव’ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सध्याचे अनेक महत्त्वपूर्ण खेळाडू लिलावात सहभागी होऊ शकतात. लिलावापूर्वी, काही मोजक्या प्रमुख खेळाडूंना संघात कायम करण्याची मुभा फ्रॅंचाईजींना दिली जाऊ शकते. २०१८ च्या मेगा लिलावापूर्वी प्रत्येक संघांना तीन खेळाडू कायम राखण्याची परवानगी दिली गेली होती. तसेच, दोन खेळाडू राइट टू मॅच कार्ड वापरून; पुन्हा एकदा संघात दाखल करून घेण्याची पद्धत वापरली गेली होती. त्याचप्रकारे हा लिलाव झाला तर, एकूण पाच खेळाडू फ्रॅंचाईजी कायम करू शकतात. त्यामुळे, काही दर्जेदार खेळाडू लिलावात उतरतील.
मेगा लिलावात काही मोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू खरेदी करण्याचा प्रयत्न सर्व संघ करतात. त्यामुळे लिलावातच बरीचशी अटीतटीची लढत होते. अधिकाधिक संघ बोली लावत गेल्याने आपल्या मूळ किमतीपेक्षा अधिक रक्कम मिळवून खेळाडू मालामाल होतात. आयपीएल २०२१ च्या लिलावात अनेक मोठे खेळाडू सहभागी होत असल्याने; त्यांच्यावर बोली ही मोठी लावली जाईल.
१) सर्वात महागडा विदेशी खेळाडू
मिचेल स्टार्क- आगामी लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा सर्वाधिक श्रीमंत विदेशी खेळाडू बनू शकतो. पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतात होणाऱ्या, २०२१ टी२० विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून; स्टार्कने आयपीएल २०२१ मध्ये खेळणे निश्चित केले आहे. स्टार्कने मागील दोन वर्ष आयपीएलमधून ऐनवेळी नाव मागे घेतले होते. २०१८ लिलावावेळी कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर नऊ कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, स्पर्धेपूर्वी दुखापतग्रस्त झाल्याने; तो एकही सामना न खेळता स्पर्धेतून बाहेर झाला होता.
सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीत असलेला स्टार्क आपल्या घातक यॉर्करसाठी ओळखला जातो. सोबतच, सातत्याने १४५ किमी/प्रतितास इतक्या वेगाने गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे, आयपीएल २०२१ लिलावात स्टार्क सर्वात महागडा विदेशी खेळाडू बनू शकतो. स्टार्कने आतापर्यंत आयपीएलचे दोन हंगाम खेळताना ३४ बळी टिपले आहेत.
२) सर्वात महागडा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
सुरेश रैना- ‘मिस्टर आयपीएल’ या नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा माजी कर्णधार सुरेश रैना हा आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक रक्कम मिळवणारा खेळाडू बनू शकतो. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रैना दुसऱ्या स्थानी आहे. गेली अनेक वर्ष तो चेन्नई सुपर किंग्स संघाचा उपकर्णधार होता. २०१६ व २०१७ असे दोन हंगाम त्याने गुजरात लायन्स संघाचे नेतृत्व देखील केले होते. रैनाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आणि आयपीएलचा दांडगा अनुभव असल्याने; अनेक संघ त्याला आपला कर्णधार करण्यासाठी इच्छुक असतील.
आयपीएल २०२० साठी रैना चेन्नई सुपर किंग्स संघाचा उपकर्णधार होता. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच तो वैयक्तिक कारणाने मायदेशी परतला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघ व्यवस्थापनाने त्याला करारातून मुक्त केले. आगामी आयपीएल लिलावात रैनाने भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक बोली मिळवली तर आश्चर्य वाटायला नको. रैनाच्या नावे आयपीएलच्या १९३ सामन्यातून ५,३६८ धावा जमा आहेत.
३) देशांतर्गत क्रिकेटमधला सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू
इशान किशन- आयपीएल २०२० वेळी सर्वांना प्रभावित केलेला इशान किशन मेगा लिलावात चांगलाच मालामाल होऊ शकतो. सलामीवीर तसेच मधल्या फळीचा फलंदाज म्हणून इशानने आपली छाप सोडली. आयपीएल २०२० विजेत्या मुंबई इंडियन्सकडून तो सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता. आक्रमक फलंदाजीसोबतच तो यष्टीरक्षण देखील करतो. मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन मेगा लिलावापूर्वी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना संघात कायम ठेवू शकते. त्यामुळे, इशान लिलावात सहभागी होऊ शकतो.
मुंबई इंडियन्सला इशानला पुन्हा संघात सामील करून घ्यायचे असेल तर, तगडी रक्कम मोजावी लागेल. कारण, इतर संघ देखील इशानला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्नशील असतील. त्यामुळे, इशान आयपीएल २०२१ लिलावात सर्वात महागडा खेळाडू बनू शकतो.