संपूर्ण भारतात कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दररोज लक्षावधी लोक या आजाराने ग्रस्त होत आहेत. भारत सरकारने यापूर्वी देशातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरण सुरू केले होते. आता १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या परिस्थितीत सुरू असलेल्या आयपीएलमधील खेळाडूंचे लसीकरण होणार का? याविषयी बीसीसीआयने माहिती दिली आहे.
बीसीसीआयची महत्त्वाची घोषणा
सध्या आयपीएलमध्ये जवळपास २०० प्रमुख खेळाडू खेळत आहेत. देशात १ मे पासून सुरु होणाऱ्या सार्वजनिक लसीकरणात देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याच वेळी बीसीसीआयने आयपीएलमध्ये खेळत असणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र या लसीकरणासाठी कोणावर जबरदस्ती केली जाणार नाही असे देखील स्पष्ट केले गेले. ज्या खेळाडूंची इच्छा असेल त्यांनाच ही लस देण्यात येईल.
विदेशी खेळाडूंना नाही मिळणार लस
या लसीकरण मोहिमेत विदेशी खेळाडूंना लस देण्यात येणार नाही. आयपीएलसाठी जवळपास १०० पेक्षा जास्त खेळाडू, प्रशिक्षक व तंत्रज्ञ भारतात आले आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज व केकेआरचा खेळाडू पॅट कमिन्स याने भारतातील कोरोना परिस्थिती पाहता पंतप्रधान मदत निधीमध्ये ५० हजार अमेरिकन डॉलरची मदत केली आहे. बीसीसीआयच्या या दुटप्पी भूमिकेमुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार
भारतात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. त्यामुळे काही खेळाडूंनी स्पर्धेतून माघारी परतण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा ऍण्ड्रू टाय याने कोरोनापेक्षा आयपीएलला जास्त महत्त्व दिले जात असल्याकारणाने आयपीएलमधून नाव मागे घेतले. तर, आरसीबीसाठी खेळणाऱ्या ॲडम झम्पा व केन रिचर्डसन यांनीदेखील कोरोनाचे कारण सांगत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने देखील या कठीण समयी कुटुंबासोबत राहण्यासाठी बोरवली स्पर्धेतून नाव माघारी घेतले आहे. दुसरीकडे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोणत्याही स्थितीत आयपीएल सुरू राहणार असल्याचे म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयवर आयपीएल इतिहासातील सर्वात मोठं संकट ओढावलं, ३० ऑस्ट्रेलियन स्वदेशी परतणार?