मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील १८ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्याक राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्सने विजय नोंदवला. दरम्यान, या सामन्यातील राजस्थान रॉयल्सचा फलंदाज डेव्हिड मिलरचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मिलरचा मजेशीर खेळ
या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना राजस्थान समोर १३४ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने जोस बटलर(५) आणि यशस्वी जैयस्वाल(२२) या सलामीवीरांच्या विकेट्स लवकर गमावल्या. पण त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबेने ४५ धावांची भागीदारी करत त्यांचा डाव सावरला.
सॅमसन आणि दुबे यांच्यात ही भागीदारी सुरु असताना डगआऊटमध्ये पायाला पॅड बांधून फलंदाजी येण्याची वाट पाहात असलेला मिलर तीन चेंडू घेऊन एक खेळ करताना दिसला. तो तीन चेंडू दोन्ही हातात घेऊन ते एका मागोमाग वर फेकत झेलण्याचा खेळ खेळत होता. त्याच्या या खेळाचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
https://twitter.com/reddyyyyyyyyyy/status/1385997893736177668
त्याच्या या व्हिडिओवर काही चाहत्यांच्या प्रतिक्रियाही आल्या. एका चाहत्याने लिहिले की ‘तो फलंदाजीला जाण्याआधी चेंडू जवळून पाहात होता.’ तसेच या सामन्यादरम्यान समालोचन करत असलेले दिग्गज क्रिकेटपटू इयान बिशप यांनीही समालोचन करताना ‘हे कोणीही करु शकतो’, असे म्हणत त्याला गमतीने ट्रोल केले.
https://twitter.com/RCBSG30/status/1385998499079069697
https://twitter.com/KartikS25864857/status/1386019552002068480
मिलरची सॅमसनसह विजयी भागीदारी
मिलर या सामन्यात दुबेनंतर(२२) राहुल तेवतिया ५ धावांवर बाद झाल्यानंतर ६ व्या क्रमांकावर फलंदाजीला आता होता. त्याने फलंदाजीला आल्यानंतर सॅमसनला चांगली साथ देताना त्याच्यासह नाबाद ३४ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी सॅमसनने ४१ चेंडूत ४२ नाबाद धावांची खेळी केली. तर मिलर २३ चेंडूत २४ धावांवर नाबाद राहिला.
कोलकाताच्या केवळ १३३ धावा
शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १३३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३६ धावा केल्या होत्या. तर दिनेश कार्तिकने २५ आणि नितीश राणाने २२ धावांची खेळी केली. अन्य कोणाला खास काही करता आले नाही. राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने ४ षटकात २३ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
तू सदैव प्रेरणास्थान राहशील! हरभजन सिंगच्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मराठमोळ्या शुभेच्छा






