इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चा उर्वरित हंगाम यंदा संयुक्त अरब अमिरातीमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पार पडणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने हा उर्वरित हंगामत कधी सुरु होईल, याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने हा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर २९ मे रोजी बीसीसीआयच्या झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित आयपीएलचा हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की उर्वरित हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होईल व अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळवण्यात येईल. म्हणजे २५ दिवसांच्या कालावधीत उर्वरित ३१ सामने होणार आहेत.
एएनआयबरोबर बोलताना बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की ‘अमिराती क्रिकेट बोर्डासह चांगली चर्चा झाली. त्यांनी बीसीसीआयच्या बैठकीपूर्वीच स्पर्धेच्या आयोजनासाठी शाब्दिक सहमती दर्शवली होती. हा हंगाम १९ सप्टेंबरला सुरु होईल आणि १५ ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल.’
तसेच उर्वरित हंगामात परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीबद्दल मोठा प्रश्न आहे. कारण जवळपास सर्वच राष्ट्रीय संघ आपापल्या आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यात सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये व्यस्त असणार आहेत. त्याबद्दल बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबद्दल चर्चा सुरु आहे. तसेच त्यांना आशा आहे की जास्तीतजास्त परदेशी खेळाडू या उर्वरित हंगामासाठी उपलब्ध असतील.
यापूर्वीच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले होते की जरी काही परदेशी खेळाडू उपलब्ध राहिले नाही, तरी स्पर्धा पूर्ण खेळवली जाईल.
दरम्यान, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा १४ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे खेळाडू आधीपासूनच बायोबबलमध्ये असल्याने त्यांना इंग्लंडमधील बायोबबलमधून थेट युएईमधील आयपीएल संघांच्या बायोबबलमध्ये हलवले जाऊ शकते. दरम्यान, इंग्लंड दौरा संपल्यानंतर १५ किंवा १६ ला भारतीय खेळाडू दुबईला पोहचतील आणि ३ दिवस क्वारंटाईन होतील. त्यानंतर ते आयपीएलमधील सामने खेळण्यास तयार होऊ शकतात.
आयपीएलचा १३ वा हंगाम झाला होता युएईमध्ये
मागीलवर्षी कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण आयपीएल २०२० हंगाम युएईमध्येच सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात आला होता. तसेच त्यापूर्वी भारतातील निवडणूकांमुळे २०१४ सालच्या आयपीएल हंगामातील काही सामनेही युएईमध्ये खेळवण्यात आले होते. आता उर्वरित १४ वा हंगामही येथेच खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितच्या भिडूने ८ वर्षांच्या वयात पाहिले होते ‘हे’ मोठे स्वप्न, दुर्दैवाने जवळ पोहोचूनही राहिला दूर
अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा देताच भारतीय संघातून हे ३ खेळाडू झाले गायब
दर आठवडल्याला २०७ किमीचा प्रवास, गुरुद्वाऱ्यातील लँगरवर भागवायचा भूक; आता आहे ‘भारताचा स्टार फलंदाज’