आयपीएलच्या मैदानात गुरुवारी(३० सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना पार पडला. सामन्यात चेन्नईने सहा विकेट्स राखून विजय मिळवला. यासह चेन्नई हंगामातील प्लेऑमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. तर दुसरीकडे हैदराबाद या पराभवासह अधिकृतरित्या प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर गेला आहे.
या हंगामात हैदराबाद संघाचे प्रदर्शन खूपच खराब राहिले आहे. हैदराबाद गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. असे असले तरी हैदराबादचे मागच्या काही वर्षांतील प्रदर्शन पाहिले तर ते समाधाणकारक होते. त्यांनी २०१६ नंतर प्रत्येक हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. चालू हंगामात मात्र, संघ स्पष्टपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
चेन्नई आणि हैदराबादच्या सामन्यानंतर गुणतालिकेचे चित्र पाहिले, तर चेन्नई पहिल्या स्थानावर आहे. चेन्नईने ११ पैकी ९ सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे हैदराबादने ११ पैकी केवळ २ सामने जिंकले आहे आणि संघ आठव्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर आहे. हैदराबादने हंगामाच्या सुरुवातीपासून पराभव पाहायला सुरुवात केली होती.
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील पहिल्या सामना त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला असून यामध्ये पराभव पत्करला होता. हैदराबादने हंगामात मिळालेल्या दोन विजयांपैकी एक पहिल्या टप्प्यात पंजाब किंग्जविरुद्ध आणि दुसरा विजय दुसऱ्या टप्प्यात २७ सप्टेंबरला राजस्थान रॉयल्स विरुद्ध मिळवला आहे.
आता हैदराबादचे केवळ ३ सामने बाकी आहेत आणि या तिन्ही सामन्यांत विजय मिळवले तरी त्यांचे या हंगामात ५ विजय होतील. त्यामुळे हा पहिलाच हंगाम असा असेल, ज्यात हैदराबाद संघ ६ सामने जिंकणार नाही. हैदराबाद २०१३ सालापासून आयपीएलमध्ये खेळत असून त्यांनी प्रत्येकवर्षी ६ पेक्षा अधिक विजय मिळवले होते.
तसेच गेल्या ९ वर्षांत ते केवळ तिसऱ्यांदाच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. यापूर्वी २०१४ आणि २०१५ मध्ये त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. २०१४ मध्ये ते ६ विजयांसह, तर २०१५ मध्ये ७ विजयांसह गुणतालिकेत ६ व्या क्रमांकावर होते.
कर्णधार बदलूनही नाही झाला काहीच फायदा
हंगामातील खराब सुरुवातीनंतर संघ व्यावस्थापनाने मोठा निर्णय घेत संघाचा कर्णधार बदलला होता. हैदराबादला २०१६ मध्ये आयपीएलचे जेतेपद मिळवून देणाऱ्या डेविड वार्नरला १४ व्या हंगामाच्या मध्येच कर्णधारपद सोडावे लागले. त्याच्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले.
मात्र, कर्णधार बदलूनही काही फायदा झाला नाही. संघाच्या कामगिरीत काहिच फरक पडलेला दिसत नाही. हैदराबादची दुसऱ्या टप्प्याची सुरुवातही खराब राहिली. २२ सप्टेंबरला खेळल्या गेलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हैदराबादला आठ विकेट्सने पराभव मिळाला. या पराभवानंतर हैदराबादचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न अवघड वाटू लागले होते.
हंगामाचा शेवट विजयाने करण्याचा असेल प्रयत्न
हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला असला, तरी त्यांना अजून तीन सामने खेळावे लागणार आहेत. अशात राहिलेल्या तिन्ही सामन्यात चांगले प्रदर्शन करून विजय मिळण्याचा संघाचा प्रयत्न असेल. संघाला ३ ऑक्टोबरला केकेआरविरुद्ध, ६ ऑक्टोबरला आरसीबीविरुद्ध आणि ८ ऑक्टोबरला मुंबई इंडियन्सविरुद्ध सामने खेळायचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: ब्रावोने अडकवला मोठा मासा आपल्या जाळ्यात, विलियम्सनने डीआरएस न घेताच धरली पॅव्हेलियनची वाट
बाबर आझमचा विराटला ठरला भारी! ‘या’बाबतीत कोहलीला मागे टाकत हिटमॅनची केली बरोबरी
मंधनाचा ऑस्ट्रेलियाला शतकी तडाखा! ‘हा’ कारनामा करणारी बनली पहिलीच भारतीय महिला क्रिकेटर






