आयपीएल २०२१ मधील दुसऱ्या टप्प्यात सोमवारी (२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमने सामने येणार आहेत. राजस्थान संघाला प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचण्यासाठी गुणतालिकेत सर्वात खाली असणाऱ्या हैदराबाद संघाविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. यासाठी संघातील फलंदाजांना मात्र कर्णधार संजू सॅमसनला साथ द्यावी लागेल.
राजस्थान संघाने आतापर्यंत आयपीएल २०२१ मध्ये एकूण ९ सामने खेळले आहेत. त्यात त्यांना फक्त ४ सामन्यात विजय, तर उर्वरित ५ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. ते ८ गुणांसह सहाव्या स्थानी आहेत. दुसरीकडे हैदराबाद संघाने ९ सामन्यात केवळ ३ विजय मिळवले आहेत. त्यामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. (IPL 2021 Will Cricketer Jason Roy Break Into Playing XI of SRH See Probable XI of SRH AND RR)
आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात राजस्थानने पंजाबविरुद्ध दोन धावांनी विजय मिळवला होता, तर शनिवारी (२५ सप्टेंबर) त्यांना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे हैदराबादला दिल्ली आणि पंजाबविरुद्ध अनुक्रमे ८ विकेट्स आणि ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
गुणतालिकेत खालच्या स्थानी असलेल्या संघांच्या तुलनेत राजस्थान संघ हैदराबाद संघाविरुद्ध फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. भारतात खेळण्यात आलेल्या आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात राजस्थानने हैदराबादला ५५ धावांनी पराभूत केले होते. राजस्थानच्या गोलंदाजी विभागाने आपली दमदार कामगिरी कायम ठेवत शनिवारी (२५ सप्टेंबर) दिल्लीला ६ विकेट्सवर १५४ धावांवर रोखले होते. मात्र, फलंदाजी विभागात संजू सॅमसनला (नाबाद ७० धावा) सोडले, तर इतर सर्वांनी निराश केले.
पंजाबविरुद्ध यशस्वी जयस्वाल आणि महिपाल लोमरोरने शानदार फलंदाजी केली होती. मात्र, दिल्लीविरुद्ध दोघेही अपयशी ठरले. लियाम लिव्हिंगस्टोन आणि डेविड मिलरही मागील सामन्यात सॅमसनसोबत भागीदारी करण्यात अपयशी ठरले. असेच काहीसे अष्टपैलू रियान पराग आणि राहुल तेवतियाबाबत झाले. हे दोघेही फलंदाजीत फ्लॉप ठरले.
मुस्ताफिजूर रेहमान, युवा कार्तिक त्यागी आणि चेतन साकारिया यांची वेगवान गोलंदाजांची तिकडी कमी अनुभव असूनही प्रभावी ठरली. दुसरीकडे तबरेज शम्सी आणि तेवतिया फिरकी विभागात चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरले.
हैदराबादबद्दल बोलायचं झालं, तर त्यांच्यासाठी आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा खूपच निराशाजनक राहिला आहे. त्यांनी आतापर्यंत ९ साामन्यांपैकी तब्बल ८ सामन्यात पराभव स्वीकारला आहे. संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी फळी फ्लॉप ठरताना दिसत आहे.
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज जॉनी बेयरस्टोने दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतल्याने संघाला मोठा झटका बसला आहे. डेविड वॉर्नरही चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. कर्णधार केन विलियम्सन, मनीष पांडे, वृद्धिमान साहा, केदार जाधव आणि अब्दुल समद हे खेळाडूही फलंदाजीत अपयशी ठरले. हैदराबादचा गोलंदाजी विभाग फिरकीपटू राशिद खानवर अवलंबून आहे. कारण या टप्प्यात खलील अहमद, भुवनेश्वर कुमार आणि जेसन होल्डर यांनी सरासरी कामगिरी केली आहे. होल्डरने पंजाबविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या होत्या.
जेसन रॉयला मिळू शकते जागा
हैदराबादच्या संघात वॉर्नरला आजच्या सामन्यात बाहेर केले जाऊ शकते. या हंगामात वॉर्नरने खास कामगिरी केली नाही. तो खराब फॉर्ममध्ये आहे. अशामध्ये त्याच्या जागी हैदराबाद जेसन रॉयला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करू शकतो. जेसन हा टी-२० क्रिकेटमधील धडाकेबाज फलंदाज आहे. टी-२० त त्याने आतापर्यंत २४५ षटकार ठोकले आहेत.
अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन-
राजस्थान रॉयल्स-
यशस्वी जयस्वाल, लियाम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक) डेविड मिलर/एविन लुईस, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवतिया, तबरेज शम्सी/ख्रिस मॉरिस, कार्तिक त्यागी, चेतन साकारिया, मुस्ताफिजूर रेहमान
सनरायझर्स हैदराबाद-
डेविड वॉर्नर/जेसन रॉय, केन विलियम्सन (कर्णधार), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मनीष पांडे, केदार जाधव/ विराट सिंग/ प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच
-ॲक्शनला रिॲक्शन! षटकार मारल्यानंतर खुन्नस देणाऱ्या भरतची विकेट घेऊन चाहरने केला असा जल्लोष