भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून केवळ खेळाडू म्हणतो खेळत आहे. भलेही त्याने चेन्नईच्या संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे रविंद्र जडेजा याच्या हाती दिली आहेत. मात्र तो अजूनही चेन्नईकडून आयपीएलच्या मैदानात कर्णधाराप्रमाणे निर्णय घेताना दिसला आहे.
शुक्रवारी (३१ मार्च) चेन्नई विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (CSK vs LSG) यांच्यात आयपीएल २०२२चा सातवा सामना (IPL 2022) झाला. या सामन्यादरम्यान धोनी क्षेत्ररक्षण सजवताना आणि गोलंदाजीबद्दल निर्णय घेताना (MS Dhoni Taking Decisions As Captain) दिसला. त्याच्या या कृतीवर भारताचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजा (Ajay Jadeja) नाराज दिसला. त्याने यावर मोठी प्रतिक्रियाही दिली आहे.
जडेजाने चेन्नई विरुद्ध लखनऊ यांच्यातील सामन्यानंतर क्रिकबजवर बोलताना (Ajay Jadeja On MS Dhoni) म्हटले की, “जितका खेळ मी पाहिला आहे, त्यावरून हे (धोनीने क्षेत्ररक्षण सजवणे, गोलंदाजी बदलातील निर्णय घेणे) चुकीचे आहे, यामध्ये कसलीही शंका नाही. माझ्याइतका दुसरा कोणीही धोनीचा मोठा चाहता नाहीय. त्याचा स्वभाव, त्याचे निर्णय सर्वकाही मला खूप भावते. धोनीने चेन्नईचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर फक्त दोनच सामने झाले आहेत. जर हा संघाचा शेवटचा सामना असता आणि करा वा मराची स्थिती असती, तर त्याने असे केल्यास ते मान्य होते.”
“बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की, येथे संघाला माझी गरज आहे आणि आपण सर्व सूत्रे आपल्या हातात घेतो. परंतु दुसऱ्याच सामन्यात जे पाहायला मिळाले, ते मला आवडलेले नाही. जडेजा इतका मोठा खेळाडू असून तो या सामन्यादरम्यान सीमारेषेवर उभा होता आणि तुम्ही (धोनी) पूर्ण खेळ चालवत होता. मी असे यासाठी म्हणत नाहीये की, हे जडेजाच्या बाबतीत घडले किंवा मी त्याची बाजू घेतोय. खरे तर तो खूप मोठा खेळाडू आहे आणि त्याच्याबद्दल असे बोलायला मला चांगले वाटत नाहीय. पण या सामन्यात जे झाले, ते मला अजिबात आवडलेले नाही,” असे जडेजाने शेवटी बोलताना सांगितले.
दरम्यान चेन्नईने लखनऊविरुद्धचा हातातील सामना गमावला आहे. प्रथम चेन्नईने रॉबिन उथप्पा, शिवम दुबे यांच्या शानदार खेळींच्या जोरावर २१० धावा फलकावर लावल्या होत्या. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला आणि ६ विकेट्स राखून सामना गमावला. हा त्यांचा हंगामातील सलग दुसरा पराभव होता. यापूर्वीही चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना गमावला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हम तो दुबे हैं सनम, तुम को भी ले डूबे’, सीएसकेच्या दुसऱ्या पराभवानंतर पडतोय मीम्सचा पाऊस
याला म्हणतात जिगर! ‘विक्रमवीर’ बाबर आझमचं मोहम्मद कैफने केलं तोंडभरून कौतुक
चेन्नई विरुद्ध २११ धावांचा कसा केला यशस्वी पाठलाग, क्विंटन डी कॉकने केले स्पष्ट