इंडियन प्रीमिअर लीग २०२२ हंगामात शुक्रवारी (८ एप्रिल) चाहत्यांना एक रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात गुजरात टायन्सने ६ विकेट्स राखून पंजाब किंग्जला धूळ चारली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सला अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळाला असून हंगामातील हा त्यांचा सलग तिसरा विजय ठरला. गुजरात टायटन्सच्या या उत्कृष्ट प्रदर्शनानंतर दिग्गज फिरकी गोलंदाज अमित मिश्राही प्रभावित झाला आहे. मिश्राने गुजरातचा प्रशिक्षक आशिष नेहराची फिरकी घेतली आहे.
शुक्रवारी (दि. ०८ एप्रिल) पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने ६ विकेट्स शिल्लक ठेऊन एक रोमांचक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने १८९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातला शेवटच्या दोन चेंडूंवर १२ धावांची आवश्यकता होती. स्ट्राईकवर असलेल्या राहुल तेवतियाने लागोपाठ दोन षटकार ठोकले आणि विजय मिळवला.
पंजाबविरुद्ध हा धमाकेदार विजय मिळवल्यानंतर अमित मिश्रा (Amit Mishra) याने खास ट्वीट करून गुजरातचा प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) याची फिरकी घेतली आहे. मिश्राने ट्वीटमध्ये लिहिले की, “गुजरात टायटन्सला आयपीएल २०२२मध्ये अजून पराभवाचा सामना करायचा आहे. जर संघाने हाच फॉर्म कायम ठेवला, तर आपल्याला पाहायला मिळू शकते की, दुसरे प्रशिक्षकही लॅपटॉप सोडून नेहराजींप्रमाणे पेन आणि कागद वापरू लागतील.” अमित मिश्राने या ट्वीटसह नेहराच्या हातात पेन आणि कागद असलेला फोटोही शेअर केला आहे.
Gujarat Titans are yet to be defeated this season. If they continue the same form, we might see other coaches also giving up laptop and picking up pen and paper like Nehra ji. 😉 #IPL #PBKSvGT #TATAIPL2022 pic.twitter.com/4PdlmnBQnu
— Amit Mishra (@MishiAmit) April 8, 2022
आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या गुणतालिकेचा विचार केला, तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसारख्या सर्वात यशस्वी संघांना चालू हंगामात एकही सामना जिंकता आलेला नाहीये, तर दुसरीकडे गुजरात टायटन्ससारख्या नवख्या फ्रँचायझीने मात्र त्यांचे पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्स सध्या तीन सामने जिंकून ६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील या संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला ५ विकेट्सने पराभूत केले होते, तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला त्यांनी १४ धावांनी मात दिली होती. तसेच, तिसऱ्या सामन्यात आता गुजरातने पंजाब किंग्जवर घासून विजय मिळवला आहे.