राजस्थान रॉयल्स संघ इंडियन प्रीमियर लीगच्य १५व्या हंगामात दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने चालू हंगामात धमाकेदार पदार्पण केले आहे. राजस्थानने या हंगामात खेळलेल्या सुरुवातीच्या तीन सामन्यांपैकी २ सामने जिंकले आहेत, पण संघातील खेळाडूंसाठी दुःखद बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अष्टपैलू नॅथन कुल्टर-नाईलच्या दुखापतीमुळे राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. हा वेगवान गोलंदाज आता चालू आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नॅथन कुल्टर नाईलला ही दुखापत झाली होती. त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये तो संघाचा भाग नव्हता. राजस्थान रॉयल्सने नॅथन कुल्टर-नाईलच्या बदलीची घोषणा केलेली नाही. सध्या राजस्थान संघ कुल्टर-नाईलच्या बदली खेळाडूच्या शोधात आहे. या लेखात आपण अशा खेळाडूंबद्दल जाणू घेऊयात जे नाईलच्या जागी संघात दाखल होऊ शकतात.
१. बेन कटिंग
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग जगातील जवळपास सर्व टी२० लीगमध्ये खेळतो. तो आयपीएलचा भागही होता. अशा परिस्थितीत नॅथन कुल्टर-नाईलच्या जागी खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये बेन कटिंग अव्वल क्रमांकावर आहे. टी२० क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही त्याला आयपीएल २०२२ मेगा लिलावात कोणत्याच संघाने विकत घेतले नाही.
आयपीएलच्या २१ सामन्यांमध्ये कटिंगने २३८ धावा केल्यात. याशिवाय त्याने १० विकेट्सही घेतल्या आहेत. आयपीएल २०१६च्या अंतिम सामन्यामध्ये बेन कटिंगने सनरायझर्स हैदराबादसाठी नाबाद ३९ धावा केल्या आणि दोन विकेट्सही घेतल्या. बेन कटिंगने अलीकडेच संपलेल्या पाकिस्तान सुपर लीग २०२१मध्ये १६४पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ९ डावात एकूण १९७ धावा केल्या.
२. दसून शनाका
श्रीलंकेच्या मर्यादित षटकांच्या संघाचा सध्याचा कर्णधार दसून शनाका गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटच्या छोट्या क्रिकेट प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करत आहे. शनाकाने आयपीएल २०२२ मेगा लिलावासाठी आपले नाव नोंदवले होते, पण कोणत्याही फ्रॅंचायझीने त्याला विकत घेण्यात रस दाखवला नाही.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतात झालेल्या टी२० मालिकेत यजमानांविरुद्ध श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू होता. त्याने तीन सामन्यांत १२४ धावा केल्या. दसून शनाका २०१६पासून टी२० क्रिकेट खेळत आहे.
३. डेव्हिड विज
आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात वीजला कोणीच खरेदी केले नाही. विज २०१५ आणि २०१६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून आयपीएल खेळला आहे. या कालावधीत त्याने १२७ धावा आणि १६ विकेट्स घेतल्या. उत्कृष्ट कामगिरी करूनही त्याला २०१७ सालापासून आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून खेळल्यानंतर विज आता नामीबियाकडून खेळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान सुपर लीग २०२१ मध्ये डेव्हिड विजने लाहोर कलंदर्सकडून खेळताना १३ सामन्यात १६८ धावा केल्या, तर गोलंदाजीत ९ विकेट्स घेतल्या. विज त्याच्या शानदार फॉर्ममुळे राजस्थान रॉयल्स संघ व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेऊ शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अगदी सचिनपासून ते धोनीपर्यंत, भारताच्या भल्या भल्या फलंदाजांना जे जमलं नाय ते शिखरने करुन दाखवलं
‘जिंकण्याची भूक दाखवा…’, कर्णधार रोहित शर्माने घेतली मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची शाळा