आयपीएल २०२२ हंगामात गुरुवारी (३१ मार्च) चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आमना सामना झाला. यामध्ये लखनऊने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. लखनऊचा युवा फलंदाज आयुष बदोनीची या सामन्यानंतर खूप चर्चा होत आहे. त्याने शेवटच्या षटकांमध्ये ९ चेंडूत महत्वाच्या १९ धावांचे योगदान दिले. विजयानंतर आयुषने प्रतिक्रिया दिली आहे.
सामना जिंकल्यानंतर आयुषने स्वतः फलंदाजी करताना त्याने अंमलात आणलेल्या रणनीतीविषयी माहिती दिली. तो म्हणाला की, “मी माझ्या भूमिकेविषयी आश्वस्त आहे. मला कोणीच काही सांगितले नव्हते, मी स्वतःशी माझा नैसर्गिक खेळ खेळणार असल्याचे बोललो होतो. मला माहिती होते की, जर मी आणि एविनने स्वतःचे शॉट्स खेळले, तर विजय आमचा असेल.”
१८ व्या षटकात चेन्नईचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो गोलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी एविन आणि आयुषच्या डोक्यात नेमका काय विचार सुरू होता? याविषयी त्याने पुढे माहिती दिली. आयुष म्हणाला की, “आम्ही त्याच्या षटकात जास्त धोका पत्करण्याच्या विचारात नव्हतो. जेव्हा शेवटची दोन षटके राहिली होती, तेव्हा आम्ही रिस्क घेतले आणि विजय मिळवला.”
सीएसकेने या सामन्यात २११ धावांचे मोठे लक्ष्य उभे केले होते, पण तरीही लखनऊने ते गाठले आणि विजय मिळवला. “आम्ही २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होतो, जे खूप चांगले होते. एक गोष्ट जी या दोन सामन्यांमध्ये मला समजली, ती म्हणजे स्वतःवर विश्वास. तुम्ही एखाद्या वरिष्ठ खेळाडूवर अवलंबून राहण्याची गरज नाहीय, स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे बदोनी पुढे बोलताना म्हणाला.
लखनऊच्या या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर सीएसकेने या हंगामात सलग दुसरा पराभव पत्करला आहे. आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले, जेव्हा सीएसकेने लागोपाठ त्यांचे सुरुवातीचे दोन सामने गमावले असतील. सीएसके आता त्यांचा पुढचा सामना रविवारी (३ एप्रिल) पंजाब किंग्जविरुद्ध खेळणार आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स त्यांचा पुढचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सोमवारी (४ मार्च) खेळायचा आहे.