आयपीएल २०२२ हंगाम सध्या शेवटच्या टप्पात येऊन पोहोचला आहे. चालू हंगामात अनेक युवा खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करून दाखवले आहे. परंतु भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू म्हणजेच विराट कोहली आणि रोहित शर्मा या हंगामात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. मागच्या हंगामापर्यंत या दोघांचे प्रदर्शन संघासाठी महत्वाचे असायचे, पण या हंगामात मात्र चित्र पूर्णपणे बदलले आहे. असे असले तरी, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींंना मात्र याविषयी कसलीही चिंता नाहीये.
आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघाला लगेच दक्षिण आफ्रिकेसोबत मायदेशात टी-२० मालिका खेळायची आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासह इतर काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. परंतु यावर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर विराट आणि रोहितचे फॉर्ममध्ये परतणे खूपच महत्वाचे असणार आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) मात्र या दोघांच्या खराब फॉर्मविषयी कसल्याच चिंतेत दिसत नाहीत. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “मी विराट-रोहितच्या फॉर्मविषयी जराही चिंता करत नाहीये. ते खूप उत्कृष्ट आणि मोठे खेळाडू आहे. टी-२० विश्वचषक अजून लांब आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की, स्पर्धेच्या खूप आधी ते त्यांचा गमावलेला फॉर्म पुन्हा मिळवतील.”
दरम्यान, आयपीएल २०२२ मधील या दोन्ही दिग्गज खेळाडूंचे प्रदर्शन पाहिले, तर ते खूपच निराशाजनक राहिले आहे. विराटने हंगामात आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये २० पेक्षा कमी सरासरीने आणि ११३ च्या स्ट्राईक रेटने २३६ धावा केल्या आहेत. संपूर्ण हंगामात त्याला फक्त एक अर्धशतक करता आले आहे. तर तीन वेळा तो गोल्डन डकवर बाद झाला आहे. आयपीएलच्या इतिहासात विराटकडून केले गेलेले हे सर्वात खराब प्रदर्शन आहे.
रोहित शर्माचे प्रदर्शन पाहिले, तर ते विराटपेक्षाही निराशाजनक आहे. रोहितने हंगामात खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये १८ च्या सरासरीने आणि १२५ च्या स्ट्राईक रेटने २१८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला एकही शतक किंवा अर्धशतक करता आले नाहीये. हंगामात आतापर्यंत तो पाच वेळा एक आकडी धावसंख्येवर, तर एकदा शून्यावर बाद झाला आहे. त्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वात आधी बाहेर पडला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रियान परागला भोवला अतिशहाणपणा! ट्रोल करत चाहत्यांनी आयपीएलमधून हाकालण्याची केली मागणी
दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झालेल्या सूर्यकुमारच्या जागी ‘या’ पठ्ठ्याची लॉटरी, बनला मुंबईकर
आयपीएलचा स्पीडस्टार उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळणे निश्चित! ‘हे’ २ युवाही ओळीत