मागच्या दोन वर्षात भारतात कोरोना विषाणूने कहर माजवल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल विदेशात खेळवली गेली. आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यावर्षीची आयपीएल स्पर्धा भारतात खेळवली जात आहे. सोबतच ५० टक्के क्षमतेसह प्रेक्षकांना मैदानात परवानगी दिली गेली आहे. लीग स्टेजचे सर्व सामने मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियमवर खेळले जात आहेत. अशात आता चालू हंगामाच्या प्लेऑफ सामन्यांविषयी महत्वाची माहिती समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, आयपीएल २०२२ चे प्लेऑफ सामने कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर आयोजित केले जाऊ शकतात. असे सांगितले जात आहे की, कोलकातामध्येच क्वालीफायर १ आणि एलिमिनेटर सामने खेळवले जाणार आहेत. तसेच क्वालीफायर २ अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. अंतिम सामनाही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला जाण्याची पूर्ण शक्यता आहे. बीसीसीआयकडून याविषयी लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.
बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने इनसाईड स्पोर्ट्सने माहिती दिली आहे की, पुढच्या काही दिवसांमध्ये आयपीएलच्या गवर्निंग काउंसिलची बैठक होणार आहे आणि त्यानंतर याविषयी अधिकृत घोषणा केली जाईल. वृत्तात अशीही माहिती दिली गेली आहे की, लखनऊच्या नवीन स्टेडियमवर देखील एक प्लेऑफ सामना आयोजित करण्याची मागणी होत आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआय आणि आयपीएल गवर्निंग काउंसिल यांच्याकडे इकाना स्टेडियमवर एक क्वालीफायर सामना आयोजित करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. असे असले तरी गवर्निंग काउंसिल हा प्रस्ताव स्वीकारेल, याची खूपच कमी शक्यता आहे.
दरम्यान, मागचे दोन आयपीएल हंगाम म्हणजेच आयपीएल २०२० आणि २०२१ हे यूएईत खेळवले गेले. मागचा हंगाम भारतात सुरू झाला होता, पण कोरोनामुळे हंगामातील निम्मे सामने यूएईत खेळवावे लागले होते. यावर्षी स्पर्धा भारतात आयोजित केली आहे, परंतु यावेळी कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. मुंबईच्या डी वाय पाटील, वानखडे आणि ब्रेबॉर्न्स या तीन, तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएस अशा एकूण चार स्टेडियमवर यावर्षीचे सर्व लीग सामने खेळले जाणार आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Video: अभिनव मनोहरवर हैदराबादच्या खेळाडूंची कृपा, चक्क ३ कॅच सोडल्यानंतर फलंदाजालाही फुटलं हसू
सलग दुसऱ्या विजयानंतर हैदराबादला मोठा धक्का, ‘हा’ स्टार क्रिकेटर २ आठवड्यांसाठी संघातून बाहेर
उमरानच्या १४०kphचा चेंडू मारण्याच्या प्रसंगावर हार्दिक म्हणाला, ‘मी अशा गोलंदाजांना असंच जाऊ देणार…’