चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२२च्या पहिल्या तिन्ही सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. तसे पाहिले तर ऋतुराज मागच्या दोन आयपीएल हंगामात देखील सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. आता याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने मत व्यक्त केले आहे.
आयपीएल २०२२च्या सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) अवघ्या २ धावा करू शकला आहे. त्याने २०२०मध्ये आयपीएल पदार्पण केले होते आणि या हंगामातील पहिल्या तीन सामन्यात अवघ्या ५ धावा केल्या होत्या. आयपीएल २०२१ मध्ये ऋतुराजने सर्वाधिक धावा केल्यामुळे ऑरेंज कॅपचा मानकरीही ठरला. मात्र, या हंगामातील पहिल्या तीनही सामन्यात त्याने अवघ्या २० धावा केल्या होत्या. आता हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने ऋतुराजचे हे आकडे पाहता, त्याला प्रत्येक हंगामातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये आराम देण्याचा सल्ला दिला आहे. कारण, चौथ्या सामन्यापासून तो स्वतःचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन देण्याचा प्रयत्न करतो.
माध्यमांसोबत बोलताना हरभजन सिंगने ऋतुराज लवकरच फॉर्ममध्ये परतेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, “जर मी संघ व्यवस्थापनाचा भाग असतो, तर मी म्हटलो असतो की, त्याला (ऋतुराज) पहिल्या तीन सामन्यांसाठी कुटुंबासोबत आराम करू द्या. त्याल थेट चौथ्या सामन्यात बोलवा. पहिले तीन सामने कशाला बर्बाद करायचे? आशा आहे की, त्याला फॉर्म गवसेल, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की, तो एक क्वालिटी खेळाडू आहे आणि त्याच्या फलंदाजीत खूप क्षमता आहे.”
सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे अद्याप संघासोबत सहभागी होऊ शकलेला नाहीये. हरभजन सिंगच्या मते संघात एका चांगल्या फिरकी गोलंदाजाचीही कमी आहे, रवींद्र जडेजाच्या साथीने संघासाठी विकेट्स घेऊ शकेल. तो म्हणाला की, “मला वाटते की, सीएसकेच्या ताफ्यात एक गोष्ट जी गरजेची आहे, ती म्हणजे एक उत्कृष्ट स्पिनर. इमरान ताहिर उत्कृष्ट गोलंदाजी करायचा आणि विकेट घ्यायचा. रवींद्र जडेजाला एका अशा सहकाऱ्याची गरज आहे, जो त्याच्यासोबत मिळून विकेट्स घेऊ शकेल.”
सीएसकेच्या ताफ्यात मुंबईकर प्रशांत सोलंकी आहे, जो उत्कृष्ट लेग स्पिन गोलंदाजी करू शकतो. तो जडेजासोबत मिळून संघासाठी फायदेशीर प्रदर्शन करू शकतो. परंतु संघ त्याला संधी देईल की नाही, हे मात्र पाहावे लागणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
स्वत:च धावला आणि रनआऊटही झाला, तरीही हार्दिकने संघ सहकाऱ्यावर काढला राग; पाहा Video
‘काही दिवस असे असतात, जेव्हा मोठे शॉट्स खेळणे…’, सामनावीर ठरलेल्या शुबमन गिलचे वक्तव्य