मागील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे सध्या संघाबाहेर आहे. त्याला जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठीही संघात जागा मिळाली नाही. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात रहाणे कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून खेळला. यावेळी त्याला एका सामन्यात दुखापत झाली होती. ती पूर्ण बरी होण्यासाठी अजून ६-८ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे, असे रहाणेने म्हटले आहे.
रहाणेला (Ajinkya Rahane) कोलकाताच्या १३व्या साखळी सामन्यात पायाच्या मांसपेशीची दुखापत झाली होती. त्यानंतर तो स्पर्धेबाहेर गेला.
“ही दुखापत होणे हे माझ्यासाठी चांगले नाही, तर ती बरी होण्यासाठी मी १० दिवस बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये राहिलो होतो. ती दुखापत पुन्हा त्रास देऊ लागल्याने आता ती पूर्णपणे बरी होण्यासाठी मी पुन्हा बेंगलोरला जात आहे. यावेळी मला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. तरीही यात ६-८ आठवडे लागण्याची शक्यता आहे. मी फिट होण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे,” असे रहाणेने म्हटले आहे.
रहाणे मुंबईमध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवलेल्या वेब सिरीजच्या ट्रेलर प्रदर्शनाला उपस्थित होता. या कार्यक्रमादरम्यान ऑस्ट्रेलियामधील विजय आणि कोलकाताचा त्याचा अनुभव त्याने सांगितला आहे.
“कोलकातामध्ये खेळण्याचा मला चांगला अनुभव आला. तेथे मी खेळण्याचा आनंद घेतला आणि तेथील वातावरणही पोषक होते. तसेच ब्रेंडन मॅक्युलमच्या प्रशिक्षणाखाली खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या,” असे रहाणे म्हणाला. त्याने या पंधराव्या आयपीएल हंगामाच्या ७ सामन्यात १३३ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये २०२०च्या मेलबर्न कसोटी सामन्यात रहाणेने ११२ धावांची खेळी केली होती. हा सामना भारताने आठ विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर भारताच्या त्या ऐतिहासिक प्रवासाला सुरूवात झाली. “ऍडलेड कसोटीमध्ये ३६ वर सर्वबाद अशा मानसिक अवस्थेत मेलबर्नमध्ये जाऊन शतक करणे आणि तो सामना जिंकणे हे खूपच अविश्वसनीय होते. ही खेळी माझ्यासाठी नेहमीच विशेष राहील. कारण, तेथून पुढे आमचा जिंकण्याचा प्रवास सुरू झाला होता,” असे रहाणेने म्हटले आहे.
चेतेश्वर पुजारा आणि रहाणे यांना मार्चमध्ये घरच्या मैदानावर श्रीलंका विरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात घेतले नव्हते. तसेच पुजाराने काऊंटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केल्याने त्याला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी संघात घेतले आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये करोडोंची बोली लागल्यानंतर खरंच तेवढे पैसे खेळाडूंच्या खात्यात जमा होतात का?