आयपीएल २०२२ च्या १२ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने सामने होते. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने उत्कृष्ट प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला आणि ७ विकेट्सच्या नुकसानावर १६९ धावा केल्या. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात काही महत्वाचे विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवले.
लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) या सामन्यात वैयक्तिक अर्धशतक करण्यात यशस्वी ठरला. त्याने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत ५० चेंडूत ६८ धावा ठोकल्या. यामध्ये त्याच्या ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्याने स्वतःचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ४० चेंडू खेळले. टी-२० क्रिकेटमधील त्याचे हे ५० वे अर्धशतक ठरले आहे.
या अर्धशतकी खेळीनंतर राहुल भारताचा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे, ज्यांनी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके केली आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटच्या नावावर एकूण ७६ अर्धशतकांची नोंद आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाराताचा नवनियुक्त कर्णधार आणि मुंबई इंडियन्सला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकवून देणारा रोहित शर्मा आहे, ज्याने आतापर्यंत ६९ टी-२० अर्धशतके केली आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर ६३ टी-२० अर्धशतकांसह शिखर धवन आहे. यादीत चौथ्या क्रमांकावर ५३ टी-२० अर्धशतकांसह सुरेश रैना आणि गौतम गंभीर विराजमान आहेत. त्यानंतर पाचव्या आणि शेवटच्या क्रमांकावर केएल राहुलने स्वतःचे स्थान बनवले आहेत. त्याने आतापर्यंत ५० टी-२० अर्धशतक केले आहेत. याचसोबत राहुल आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट सरासरी असणारा फलंदाजही आहे. त्याने आयपीएलमध्ये ५६.१६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
दरम्यान, लखनऊ आणि हैदराबात यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर सनरायझर्स हैदराबादने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने मर्यादित २० षटकांमध्ये ७ विकटे्सच्या नुकसानावर १६९ धावा केल्या. यामध्ये कर्णधार राहुलने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. तसेच दीपक हुडाने ३३ चेंडूत ५१ धावा ठोकल्या.
महत्वाच्या बातम्या –
लखनऊच्या घातक सलामीवीराला बाद करण्यासाठी केनचा ‘ice-cool’ कॅच, विजेच्या वेगाने टिपला झेल
कोण आहे जीतेश शर्मा? ज्याने आयपीएल पदार्पणात स्टार क्रिकेटर धोनीला बाद करण्यात दिले योगदान
धोनी स्वत:च पुसतोय स्वत:ची ओळख? पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर होतोय जोरदार ट्रोल