काही दिवसांपूर्वी इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये पार पडला. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारत जेतेपद पटकावले होते. आता चाहते आयपीएल २०२२ स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामागील प्रमुख कारण म्हणजे या स्पर्धेत चाहत्यांना २ नवीन संघ पाहायला मिळणार आहेत. तसेच खेळाडूंचा लिलाव देखील आयोजित करण्यात येणार आहे.
आयपीएल २०२२ स्पर्धेत ८ ऐवजी १० संघ मैदानात उतरणार आहेत. तर सामन्यांची संख्या देखील ६० वरून ७४ वर जाणार आहे. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल २०२२ स्पर्धेत २ एप्रिल रोजी सुरू होऊ शकते. तर स्पर्धेतील पहिला सामना चेन्नईमध्ये खेळवला जाऊ शकतो. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की,या स्पर्धेचा कालावधी ६० दिवसांपेक्षा जास्त असू शकतो. त्यामुळे स्पर्धेचा अंतिम सामना ४ किंवा ५ जून रोजी खेळवला जाऊ शकतो. सर्व संघांना १४-१४ सामने खेळण्याची संधी मिळेल.
चेन्नईच्या मैदानावर सामना रंगणार म्हणजे उद्घाटन सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघ असणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध होईल याबाबत कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नाहीये. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होऊ शकतो. कारण या दोन्ही संघांमध्ये नेहमीच हाय व्होल्टेज सामना पहायला मिळत असतो.
मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक ५ वेळेस तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने ४ वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
आयपीएल २०२० स्पर्धा आणि आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले होते. आता भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्यामुळे बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी आयपीएल २०२२ स्पर्धा भारतात होणार असल्याची घोषणा केली आहे. या हंगामासाठी लखनऊ आणि अहमदाबाद या दोन्ही संघांचा समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘भारताची जुनी जर्सी पुन्हा आणायची वेळ आली’, वसीम जाफर यांचा अजब सल्ला
डीविलियर्स, विराटसारख्या दिग्गजांनी केला धनश्री वर्माच्या इशाऱ्यावर डान्स, पाहा व्हिडिओ
श्रेयसचे कसोटी पदार्पण जवळपास पक्के, पण तरी ‘या’ फलंदाजाकडून मिळू शकते आव्हान