भारतीय संघाचे क्रिकेटपटू दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्या यांच्यात मागच्या वर्षी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेदरम्यान वाद झाला होता. परंतु, आयपीएल २०२२ मध्ये या दोघांना एकाच संघाकडून खेळावे लागणार आहे. आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झालेली फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्सने कृणाल आणि हुड्डा या दोघांना संघात सामील केले. या दोघांच्या वादाविषयी आता संघाचा मेंटॉर गौतम गंभीरने मत मांडले आहे.
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लखनऊ संघाच्या मेंटॉर पदाची जबाबदारी भारताची माजी दिग्गज सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या खांद्यावर आहे. गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाइट रायडर्सने दोन आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि आता तो लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Supergiants) संघाला मार्गदर्शन करणार आहे. कृणाल पांड्या (krunal pandya) आणि दीपक हुड्डा (Deepak Hooda) यांच्याविषयी गंभीरचे मत आहे की, क्रिकेटच्या मैदानात चांगले प्रदर्शन करण्यासाठी मैत्री असणे गरजेचे नसते.
पीटीआयसोबत बोलताना गंभीर म्हणाला की, “प्रदर्शन करण्यासाठी तुम्हाला मैदानाबाहेर सर्वात चांगले मित्र असण्याची गरज नाही. ते प्रोफेशनल आहेत आणि त्यांना माहिती आहे की, त्यांना एक काम करायचे आहे. जर तुम्ही एका संघात खेळत आहात, तर तुम्हाला दररोज रात्री जेवणासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. मी आतापर्यंत ज्या संघांसाठी खेळलो, त्या प्रत्येक संघात माझे मित्र होते, असे नाही, पण त्या गोष्टीने मला मैदानात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्यापासून कधी थांबवले नाही.” गंभीरच्या मते कृणाल आणि हुड्डा परिपक्व खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे की, त्यांना सामना जिंकायचा आहे.
दरम्यान, मागच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान हुड्डा आणि कृणालचा वाद जगासमोर आला होता. कृणाल बडोदा संघाचा कर्णधार असून हुड्डा देखील त्याच संघाचे प्रतिनिधित्व करत होता. स्पर्धेदरम्यान हुड्डाने आरोप केला होता की, कृणाल संघातील खेळाडूसमोर त्याच्यासोबत गैरवर्तन करतो आणि त्याने शिवीगाळ देखील केली आहे. कृणालकडून हुड्डाला संघातून बाहेर करण्याची धमकीही मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर हा वाद चिघळला होता. हुड्डाने बडोदा संघही यानंतर सोडला.
पण, आता हे दोन्ही खेळाडू २८ मार्च रोजी पुन्हा एकदा एकाच रंगाच्या जर्सीमध्ये आयपीएलच्या मैदानात पुन्हा एकत्र खेळताना दिसणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना होईल.
महत्वाच्या बातम्या –
त्यावेळी किरण मोरेंनी पैश्यांना प्राधान्य दिले असते तर आज कृणाल-हार्दिक टीममध्ये दिसले नसते
IPL 2022 | ‘या’ ५ गोलंदाजांवर असेल सर्वांचे लक्ष, एका षटकात पालटू शकतात सामन्याचे चित्र
मागच्या १ वर्षात ‘या’ ४ खेळाडूंनी सोडली नाही टीम इंडियाची साथ; तरीही आयपीएलमध्ये राहिले अनसोल्ड