आयपीएल २०२२ मध्ये दोन नवीन फ्रेंचायझी लखनऊ आणि अहमदाबाद सामील होणार आहेत. पुढच्या वर्षी स्पर्धेत आठ ऐवजी दहा संघ खेळताना दिसतील. याच पार्श्वभूमीवर पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मेगा लिलाव (IPL 2022 Mega Auction) आयोजित केला जाणार आहेत. मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडू सहभाग घेणार आहेत. पण काही दिग्गजांनी मात्र, मेगा लिलावातून स्वतःचे नाव मागे घेतले आहे. यामध्ये ख्रिस गेलसारख्या तुफानी खेळाडूचे देखील नाव आहे. आपण या लेखात अशा पाच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, ज्यांनी आयपीएलच्या मेगा लिलावातून स्वतःचे नाव मागे घेतले आहे आणि पुढच्या हंगामात ते खेळताना दिसणार नाहीत.
1. ख्रिस गेल (Chris Gayle) –
वेस्ट इंडीजचा धडाकेबाज क्रिकेटपटू ख्रिस गेल आयपीएलमधील आतापर्यंच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. मात्र, आयपीएल २०२२ च्या मेला लिलावापूर्वी त्याने स्वतःचे नाव मागे घेतले आहे. आयपीएलच्या मागच्या काही हंगामातील त्याचे प्रदर्शन देखील समाधानकारक राहिले नाहीय. अशात त्याने मेगा लिलावातून माघार घेतल्यानंतर तो आता पुन्हा मैदानात दिसेल याची खूपच कमी शक्यता आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्यांपैकी गेल एक आहे. २०१३ मध्ये त्याने पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध १७५ धावांची खेळी केली होती, जो आयपीएलमध्ये आजपर्यंतचा अबाधित विक्रम आहे. गेलने आयपीएलमध्ये खेळलेल्या १४२ सामन्यांमध्ये ४९६५ धावा केल्या आहेत, यामध्ये त्याच्या ३५७ षटकारांचा देखील समावेश आहे. मागच्या हंगामात तो पंजाब किंग्जसाठी खेळला होता. पण संघाने त्याला पुढच्या हंगामासाठी रिटेने केले नाही.
2. बेन स्टोक्स (Ben Stokes) –
इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आयपीएल २०२१ मध्ये दुखापत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर झाला होता. त्यानंतर त्याने बऱ्याच दिवसांसाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात देखील तो सहभागी झाला नव्हता. नुकत्याच पार पडलेल्या ऍशेस मालिकेतून त्याने इंग्लंड संघात पुनरागमन केले. पण, तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. पाच कसोटी सामन्यांच्या या ऍशेस मालिकेत त्याने २३६ धावा केल्या आणि अवघ्या चार विकेट्स घेतल्या. तो सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर तो काउंटी चॅम्पियनशिप खेळणार आहे.
3. जो रूट (joe root) –
इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने यावर्षी आयपीएलच्या मेगा लिलावात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या मानहानीकारण पराभवानंतर त्याने निर्णय बदलल्याचे दिसले. ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेत ४-० असा विजय मिळवला. यानंतर रूटवर नक्कीच दबाव वाढला आहे आणि याच कारणास्तव आता तो आयपीएलच्या मेगा लिलावात सहभागी होणार नाही.
4. जोफ्रा आर्चर (Jofra Archer) –
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर देखील यावर्षी आयपीएलच्या मेला लिलावात दिसणार नाही. आर्चर सध्या दुखापतीशी झगडत आहे आणि मागच्या वर्षी त्याची शस्त्रक्रिया देखील झाली आहे. तो मागच्या मोठ्या काळापासून क्रिकेटमधून विश्रांतीवर आहे आणि तो पूर्णपणे फिट होण्यासाठी काही काळ लागणार आहे. अशात तो आयपीएलमध्ये सहभाग घेऊन पुन्हा स्वतःच्या शरीराला धोक्यात टाकू इच्छित नाही. याच कारणास्तव त्याने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावातून स्वतःचे नाव मागे घेतले आहे. यापूर्वी तो राजस्थान रॉयल्ससाठी खेळला आहे. मात्र, पुढच्या हंगामासाठी त्याला संघाने रिटेन केले नाही.
5. मिचेल स्टार्क (Mitchel Starc) –
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आयपीएलमध्ये पुढच्या हंगामातून पुनरागम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर्षी ऑस्ट्रेलियात आयसीसी टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर त्याने आयपीएल २०२२ मध्ये खेळणार असल्याचे सांगितले होते. परंतु, आता त्याचे मन पुन्हा वळले आहे. आता तो आयपीएलमध्ये खेळणार नाहीय आणि याचे कसलेही कारण अद्याप समोर आलेले नाहीय.
यापूर्वी तो २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून आयपीएल खेळळा होता. तसेच २०१८ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने ९.४ करोड रूपयांमध्ये विकत घेतले होते. मात्र, दुखापतीमुळे तो या हंगामात खेळू शकला नव्हता. त्यानंतर २०२० आयपीएल लिलावातून त्याने माघार घेतली होती.
महत्वाच्या बातम्या –
धोनीनंतर ‘हा’ फलंदाज निभावू शकतो सर्वोत्तम फिनिशरची भूमिका, सुनील गावसकरांनी सुचवला पर्याय
भारताला धक्का! १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यातून कर्णधारासह ‘हे’ ५ खेळाडू बाहेर
मुंबई-पुणे भूषवणार आयपीएल २०२२ चे यजमानपद? ‘या’ दिवशी होऊ शकतो शुभारंभ
व्हिडिओ पाहा –