शनिवारी (९ एप्रिल) आयपीएल २०२२च्या १८व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ७ विकेट्स राखून धूळ चारली. मुंबई इंडियन्सचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादवने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आता याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज खेळाडू रवी शास्त्रींनी सूर्यकुमारचे कौतुक केले आहे. शास्त्रींच्या मते सूर्यकुमारला त्याच्या कामगिरीसाठी ‘सूर्य नमस्कार’ केला पाहिजे.
आयपीएल २०२२च्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सहभागी नव्हता. यादरम्यानच्या काळात तो दुखापतग्रस्त होता, पण त्यानंतर मागच्या दोन सामन्यात त्याने अर्धशतके ठोकत जोरदार पुनरागमन केले आहे. चालू हंगामातील पहिला सामना त्याने कोलकाता नाईट रायडर्ससोबत खेळला होता आणि यामध्ये ५२ धावांची महत्वाची खेळी केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात आरसीबीविरुद्ध त्याने ३७ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. सूर्यकुमारच्या या खेळीमुळे मुंबई इंडियन्सला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.
रवी शास्त्री (Ravi Shastri) सूर्यकुमारचे कौतुक करताना म्हणाले की, “अविश्वसनीय. त्याने शेवटच्या सामन्यात एक सोनेरी खेळी केली होती आणि आजचा दिवस (शनिवारी) खरोखर खास होता. जेव्हा तुमच्या ५० धावांवर ० विकेट्स असतील, नंतर तुम्ही ८९ धावांवर ६ विकेट्स गमावता आणि अशा परिस्थितीत तुमचा संघ शेवटच्या ५ षटकांमध्ये ७१ धावा करतो, ज्यामध्ये सूर्यकुमारचे योगदान सर्वात मोठे आहे, तर तुम्हाला माहिती पाहिजे की, शेवटी जेव्हा तो जात असेल, तेव्हा त्याला सूर्य नमस्कार केला पाहिजे.”
“तो जेवढे शॉट खेळतो, त्यामध्ये मनगटाचा उपयोग करतो. त्याचा प्रयत्न एवढाच असतो की, गॅप कुठे आहे आणि तो त्याच ठिकाणी खेळतो. एबी डिविलियर्सने त्याच्या काळात हेच केले होते. तुम्हाला क्रिकेटमध्ये त्याच्यासारखे खूप जास्त भेटणार नाहीत. आधी डिविलियर्स होता, बटलर आणि सूर्यकुमार आहेत. जागतिक पातळीवर फक्त हेच काही खेळाडू आहेत,” असे शास्त्री पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, मुंबई आणि आरसीबीच्या या सामन्याचा विचार केला, तर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १५१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने हे लक्ष्य १८.३ षटकात आणि ३ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
RR vs LSG: लखनऊचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय; दोन्ही संघात २ महत्त्वाचे बदल
Video: सूर्यकुमारने करून दिली धोनीची आठवण! हेलिकॉप्टर शॉटने ठोकला तब्बल ९८ मीटरचा षटकार






