दिग्गज एमएस धोनी याच्या नेतृत्वाती चेन्नई सुपर किंग्स संघ आगामी आयपीएल हंगामासाठी तयार आहे. संघ सुरतमध्ये सराव करत आहे आणि २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. धोनीच्या सीएसकेने आतापर्यंत ४ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि आगामी हंगामात त्यांची नजर पाचव्या आयपीएल ट्रॉफीवर असणार आहे.
सीएसकेवर २०१६ आणि २०१७ हंगामात बंदी घातली गेली होती, परंतु २०१८ हंगामात संघाने जोरदार पुनरागमन केले आणि विजेतेपद जिंकले. आगामी हंगामासाठी सीएसकेचा संघ जरी तयार असला तरी, संघाला सावध राहावे लागणार आहे. कारण सीएसकेप्रमाणेच इतर काही संघ आहेत, ज्यांना आगामी हंगामासाठी मेगा लिलावात एक भक्कम संघ तयार केला आहे. आपण या लेखात अशा तीन संघांवर नजर टाकणार आहोत, जे आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चेन्नईला टक्कर देऊ शकतात.
मुंबई इंडियन्स आणि सीएसके ३२ वेळा आले आहेत आमने-सामने
आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रेंचायझी मुंबई इंडियन्स संघाने (Mumbai Indians) आतापर्यंत सर्वाधिक ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे सीएसकेने ४ वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या इतिसाहात अनेक वेळा मुंबई आणि चेन्नई संघ अंतिम सामन्यात आमने सामने आले आहेत.
आगामी आयपीएल हंगामात २१ एप्रिल आणि १२ मे या दोन दिवशी मुंबई आणि चेन्नई यांच्यात सामना होईल. आतापर्यंत या दोन संघात ३२ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी १९ सामन्यांमध्ये मुंबई, तर १३ सामन्यांमध्ये सीएसके संघ विजयी ठरला आहे. आयपीएल २०२२ मध्ये या दोन संघातील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबी देऊ शकतो सीएसकेला टक्कर
एमएस धोनी याच्या नेतृत्वातील सीएसके आणि विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) जेव्हा जेव्हा आमने सामने आले, तेव्हा सामना रोमांचक झाला आहे. अधिक सामन्यांमध्ये सीएसके संघ आरसीबीवर भारी पडला आहे. असे असले तरी, आगामी आयपीएल हंगामात आरसीबी संघ सीएसकेला चांगलीच टक्कर देऊ शकतो. विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडले असून फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) संघाचा नवीन कर्णधार आहे.
डू प्लेसिस अनेक वर्षी धोनीच्या नेतृत्वात सीएसकेसाठी खेळला आहे. आरसीबी आणि सीएसके यांच्यात ग्रुप स्टेजदरम्यान दोन सामने खेळले जातील. पहिला सामना १२ एप्रिल आणि दुसरा सामना ४ मे रोजी होईल. आरसीबीने सीएसकेविरुद्ध आतापर्यंत २७ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी ९ मध्ये विजय मिळवला आहे, १७ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. आगामी हंगामात आरसीबी सीएसकेविरुद्ध त्यांच्या आकड्यांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नात दिसेल.
लखनऊ सुपर जायंट्सकडेही आहे भक्कम संघ
आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेला संघ लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) देखील सीएसकेला टक्कर देण्यासाठी एक प्रबळ संघ ठरू शकतो. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात लखनऊने सर्वोत्तम संघ बनवला आहे, असे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या संघात काही अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहेत, जे सामना जिंकवून देऊ शकतात.
धोनीला मागच्या मोठ्या काळापासून लेग स्पिन गोलंदाजी खेळताना अडचण निर्माण होत असल्याचे दिसले आहे. धोनीच्या विरोधात रवी बिश्नोई लखनऊ संघासाठी महत्वाची कामगिरी करू शकतो. तसेच युवा वेगवान गोलंदाज आवेश खान देखील सीएसकेच्या फलंदाजांची कोंडी करू शकतो.
लखनऊ सुपर जायंट्ससाठी शक्यतो केएल राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक डावाची सुरुवात करतील. हे दोघांमध्येही कोणत्याही परिस्थितीत संघासाठी मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. जर दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिले, तर विरोधी संघ नक्कीच अडचणीत येऊ शकतो. चेन्नई आणि लखनऊ सुपर जायंट्स ३१ मार्चला आमने सामने असतील.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल बनला भारताचा ‘जावईबापू’, लग्नाचे PHOTO आले समोर
एमएस धोनीच्या ७ वर्षीय लेकीचे गंगा स्नान, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
धोनीबद्दल काय आहेत भावना? गंभीर म्हणतोय, ‘१३८ कोटी लोकांसमोर सांगू शकतो की…’