आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्स संघाने युवा फलंदाज तिलक वर्माला मेगा लिलावात १.७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आणि पहिल्या सामन्यापासूनच त्याला खेळण्याची संधी मिळाली. सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत तिकल मध्यक्रमात त्याच्यावर संघाने दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिलक हैदराबाद संघासाठी खेळतो. पण देशांतर्गत क्रिकेट ते मुंबई इंडियन्सचा प्रवास त्याच्यासाठी वाटतो तितका सोपा राहिलेला नाहीय. आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशाने त्याला आई वडिलांसाठी स्वतःचे घर घ्यायचे आहे.
तिलक वर्मा (Tilak Varma) क्रिकबजशी बोलताना त्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी व्यक्त झाला. तो म्हणाला की, “जेव्हा मी मोठा होत होतो, तेव्हा कुटुंबाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागला. माझ्या वडिलांचा पगार खूप जास्त नव्हता. त्यांच्या पगारातून माझे क्रिकेट आणि मोठ्या भावाच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण व्हायचा. परंतु, मागच्या काही वर्षात परिस्थिती बदलली आहे. स्पॉन्सरशिप आणि सामन्याच्या फीमधून मी आता क्रिकेटच्या सरावाचा खर्च पूर्ण करत आहे.”
आई वडिलांसाठी घेणार स्वतःचे घर
तिलक पुढे बोलताना म्हणाला की, “आमच्याकडे स्वतःचे घर नाहीय. त्यामुळे मी या आयपीएलमधून जे काही कमवेल, त्यातून माझे फक्त एकच स्वप्न आहे की, मी लीगमध्ये मिळणाऱ्या पैशातून माझ्या आई वडिलांसाठी एक घर घेऊ शकेल. आयपीएलच्या या पैशामुळे मला मोकळेपणाने खेळण्याचे स्वतंत्र मिळेल.”
मुंबई इंडियन्से विकत घेतल्यानंतर आई-वडील आणि प्रशिक्षक झाले भावूक
“ज्या दिवशी आयपीएलचा लिलाव सुरू होता, मी माझ्या प्रशिक्षकांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. लिलावात माझी किंमत वाढत चालली होती. ती पाहून प्रशिक्षकांच्या डोळ्यात पाणी आले होते. जेव्हा मी निवडलो गेलो, तेव्हा मी माझ्या आई-वडिलांना फोन केला. ते देखील माझ्यासोबत बोलताना रडू लागले होते. माझी आई इतकी भावुक आहे की, तिच्या तोंडातुन शब्द फुटत नव्हते,” असेही तिलकने पुढे बोलताना सांगितले.
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ मधील त्यांचे पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. परंतु, मध्यक्रमात तिलक वर्माने त्याची जबाबदारी चोख पार पाडली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्या त्याने २२, तर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ६१ धावा केल्या.