शनिवार रोजी (०२ एप्रिल) आयपीएल २०२२ चा दुसरा डबल हेडर खेळला गेला. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळल्या गेलेल्या या चित्तथरारक सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांनी खोऱ्याने धावा ओढल्या. सुरुवातीला राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलर याने शानदार शतक केले. त्यानंतर मुंबईकडूनही सलामीचा फलंदाज इशान किशन याने धमाकेदार अर्धशतक झळकावले.
या सामन्यातील खेळींनंतर या दोन्ही फलंदाजांच्या धावा समान झाल्या, तरीही सर्वाधिक धावांसाठी दिली जाणारी ऑरेंज कॅप (Orange Cap) मात्र इशानच्या डोक्यावर सजली.
मुंबई विरुद्ध राजस्थान (MI vs RR), या सामन्यात बटलरने (Jos Buttler) ६८ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले आणि त्याच्या दोन सामन्यांमध्ये १३५ धावा झाल्या. दुसरीकडे राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ मैदानात उतरला आणि इशानने (Ishan Kishan)सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने ४३ चेंडू खेळताना १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. त्यामुळे इशानच्याही बटलरएवढ्याच १३५ धावा झाल्या. पण दोघांच्या धावा समान असल्या तरीही ऑरेंज कॅप मात्र इशानला देण्यात आली. याचे चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. पण यासाठी ऑरेंज कॅपचा नियम (Orange Cap Rule) समजून घेणे महत्वाचे आहे.
आयपीएलमधील ऑरेंज कॅपचा नियम आहे तरी काय?
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप मिळते, हे सर्वांनाच माहिती आहे. पण दोन फलंदाजांच्या समान धावा असतील, तर ज्याने कमी चेंडूंमध्ये या धावा केल्या आहेत अर्थातच त्याचा स्ट्राईक रेट पाहणे महत्वाचे असते. क्रिकेटमध्ये फलंदाजीची सरासरी आणि स्ट्राइक रेट बघितला जातो. पण ऑरेंज कॅपसाठी मात्र स्ट्राइक रेट बघितला जातो. कारण आयपीएल हा फार जलद खेळ आहे, त्यामुळे कमी चेंडूत कोणी जास्त धावा केल्या? या गोष्टीला महत्व दिले जाते.
सध्याच्या घडीला इशानचा स्ट्राइक रेट हा १४८.३५ एवढा आहे, तर त्याने या १३५ धावा ९१ चेंडूंमध्ये केल्या आहेत. दुसरीकडे बटलरचा स्ट्राइक रेट हा १४०.६२ एवढा आहे आणि त्याने १३५ धावा करण्यासाठी ९६ चेंडू खेळले आहेत. त्यामुळे स्ट्राइक रेट आणि कमी चेंडू खेळण्याच्या बाबतीत इशान हा बटलरच्या पुढे आहे. त्यामुळे दोघांच्या समान धावा असल्या तरीही बटलरकडे ऑरेंज कॅप न जाता ती इशानकडे देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अनहोनी को होनी कर गए धोनी..! माहीच्या ‘सुपरफास्ट’ रनआऊटची चर्चा, दाखवली चित्यासारखी चपळता
टॉम लॅथमने वाढदिवस बनवला आणखी खास, तब्बल २४ वर्षांपूर्वीचा सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम काढला मोडीत