आयपीएलच्या मैदानात सोमवारी (१६ मे) पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात रंगतदार सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात पंजाब किंग्जला १७ धावांनी मात दिली. या विजयानंतर दिल्लीचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. शार्दुल ठाकूरने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि स्वतःच्या संघाला विजय मिळवून दिला. या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. सामना संपल्यानंतर त्याने खास प्रतिक्रिया दिली.
सामनावीर निवडला गेल्यानंतर शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) म्हणाला की, “मला अवघड परिस्थितीत प्रदर्शन करायला आवडते. मागचे दोन्ही सामने आमच्यासाठी महत्वाचे होते. मला नेहमी आनंद होतो, जेव्हा अशा परिस्थितीत प्रदर्शन करतो. डावातील ६ वे षटक माझ्यासाठी एक मोठे षटक होते, ज्यामध्ये मी दोन विकेट्स नावावर केल्या.”
“फिरकी गोलंदाजांनी देखील या सामन्यात चांगली कामगिरी केली. एका गोलंदाजी आक्रमणाच्या रूपात तुम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करता. १२ व्या षटकार दव पडले होते, त्यामुळे कुलदीप यादवला गोलंदाजीसाठी बोलवले गेले नाही. मी चांगली तयारी करत आहे. मला जेव्हा कधी संधी मिळते, तेव्हा मी बॅटने धावा करण्याचाही प्रयत्न करतो.” शार्दुलने पंजाब किंग्जविरुद्धच्या या सामन्यात ४ षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने ३६ धावा खर्च करून ४ विकेट्स नावावर केल्या.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पंजाबचा कर्णधार मयंक अगरवालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात जेव्हा पंजाबचा संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्यांना हे लक्ष्य गाठता आले नाही. मर्यादित २० षटकांमध्ये पंजाब किंग्जने ९ विकेट्सच्या नुकसानावर १४२ धावा केल्या.
या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मागे टाकत गुणतालिकेत चौथा क्रमांक मिळवला आहे. दिल्ली आणि आरसीबीकडे प्रत्येकी १४ गुण आहेत आणि प्लेऑफमध्ये जागा बनवण्यासाठी या दोन संघात स्पर्धा दिसत आहे. गुजरात टायटन्स (२० गुण), राजस्थान रॉयल्स (१६ गुण) आणि लखनऊ सुपर जायंट्स (१६ गुण) या तीन संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मी आत्ता केवळ २४ वर्षांचा’, असं का म्हणाला रिषभ पंत? वाचा सविस्तर
दिल्लीच्या पंजाबवरील विजयानंतर कोणाला आहे प्लेऑफसाठी सर्वाधिक चान्स? जाणून घ्या समीकरण
एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज: सार्थ बनसोडेचा मानांकित खेळाडूवर विजय