आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. कोरोना माहामारीचा प्रभाव सध्या देशभरात कमी असला, तरी आगामी आयपीएल हंगामात कोरोना निमयांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. बीसीसीआयने मंगळवारी (१५ मार्च) यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
आगामी हंगामात जर एखाद्या खेळाडूने किंवा सपोर्ट स्टाफच्या सदस्याने संघाच्या बायो बबलचे उल्लंघन केले, तर त्याला सात दिवस विलगीकरण किंवा एका सामन्यांतून बाहेर ठेवले जाऊ शकते. जर ही चूक एखाद्या व्यक्तीने वारंवार केली, तर त्याच्यावर संपूर्ण हंगामादरम्यान बंदी घातली जाऊ शकते आणि संघातून बाहेरही केले जाऊ शकते. हे सर्व नियम खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसह सामना अधिकारी आणि खेळाडूंच्या कुटुंबीयांसाठीही लागू होतात.
जर संघ जाणूनबुजून एखाद्या व्यक्तीला संघाच्या बायो बबलमध्ये येण्याची परवानगी देत असेल, तर संघावर मोठी कारवाई केली जाऊ शकते. संघाकडून पहिल्यांदा अशी चूक झाल्यास त्यांना १ कोटी रुपयांचा दंड भरावा लागू शकतो आणि ही चूक पुन्हा झाल्यास संघाचे एक किंवा दोन गुण कमी केले जाऊ शकतात. खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफच्या कुटुंबीयांसाठीही नियम अधिक कडक आहेत. कुटंबीयांनी जर दुसऱ्यांदा बायो बबलचे उल्लंघन केले, तर त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल.
मंगळवारी बीसीसीआयने सांगितेल की, “कोविड १९ महामारी लोकांच्या आरोग्यासाठी एक गंभीर धोका आहे आणि सुरक्षित बातावरण तयार करण्यासाठी केल्या गेलेल्या नियमांप्रती प्रत्येकाचा सहयोग, वचनबद्धता आणि पालन सर्वोपरी आहे.”
खेळाडू, सपोर्ट स्टाफ किंवा सामना अधिकाऱ्यांनी बायो बबलचे उल्लंघन केल्यास केली जाणारी कारवाई –
पहिली चूक – आयपीएल २०२२ दरम्यान आरोग्य आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्धारित केले गेलेल्या नियमांनुसार सात दिवसांचे विलगीकरण. (ज्या सामन्यांमध्ये हे सदस्य सहभाग घेऊ शकणार नाहीत, त्याचा कसलाही मोबदला त्यांना मिळणार नाही.)
दुसरी चूक – ७ दिवसांचे विलगीकरण आणि ते पूर्ण झाल्यानंतर एका सामन्यासाठी बंदी. (कसलाही मोबदला मिळणार नाही.)
तिसरी चूक – हंगामातील उरलेल्या सामन्यापूर्वी संघातून बाहेर केले जाईल. तसेच संघाला पर्यायी खेळाडूही मिळणार नाही.
कुटुंबातील सदस्यांनी बायो बबल न पाळल्यास केली जाणारी कारवाई –
पहिली चूक – कुटुंबातील सदस्य आणि संबंधीत खेळाडूंना सात दिवसाचे विलगीकरण पार पाडावे लागणार. सपोर्ट स्टाफ किंवा सामना अधिकारी यांनाही सात दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागणार. (यादरम्यान होणाऱ्या सामन्यांचा कसलाही मोबदला मिळणार नाही)
दुसरी चूक – यावेळी कुंटंबाला बायो बबलमधून बाहेर केले जाईल आणि संबंधित खेळाडू, सपोर्ट स्टाफचा सदस्य, किंवा अधिकारी यांना सात दिवसाच्या विलगीकरणातून जावे लागेल. (यादरम्यान कसलाही मोबदला मिळणार नाही.)
महत्वात्या बातम्या –
झुलन गोस्वामीने गाठले कपिल देव, क्रिकेटमधील ‘ही’ असाध्य कामगिरी करण्यात महान अष्टपैलूची केली बरोबरी
आयपीएलला राजकारणाचा विळखा? मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्या खेळाडूंच्या गाड्या, चौघांना अटक; वाचा कारण
हार्दिकला मिळणार तेवतियाची साथ; अष्टपैलू म्हणतोय, ‘आता जबाबदारी घ्यावी लागेल’