येत्या महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (आयपीएल २०२२, IPL 2022) हंगाम रंगणार आहे. काही दिवसांपूर्वीच या हंगामाचा मेगा लिलाव बंगळुरू येथे झाला आहे. या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्ससह सर्व १० संघांनी मोठमोठ्या खेळाडूंना विकत घेत संघाला मजबूत बनवले आहे. यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघातून मोठी बातमी पुढे येत असून त्यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन (Shane Watson) याला आपल्या संघासोबत जोडले आहे.
वॉटसन दिल्ली संघाच्या प्रशिक्षण विभागाचा (Shane Watson To DC Assitant Coach) सदस्य असेल. दिल्ली संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या म्हणण्यावर वॉटसनला ही जबाबदारी देण्यात आली आहे.
आतापर्यंत वॉटसन आयपीएलमध्ये खेळाडूच्या रूपात खेळताना दिसला आहे. त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स संघांचे प्रतिनिधित्त्व केले आहे. तो २ वेळा आयपीएल विजेत्या संघाचा भागही राहिला आहे. २००८ मध्ये तो राजस्थान संघाचा भाग होता, ज्यांनी शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तर २०१८ मध्ये तो विजेत्या एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता.
मात्र आता वॉटसन आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, ४० वर्षीय वॉटसन आगामी हंगामासाठी दिल्लीच्या प्रशिक्षण विभागाचा भाग असेल. तो दिल्ली संघाचा साहाय्यक प्रशिक्षक असेल. त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून फक्त करारावर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया बाकी आहे.
महत्त्वाचे म्हणजे, वॉटसनसह माजी भारतीय क्रिकेटपटू अजित आगरकर यांनाही दिल्ली संघाचा साहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले आहे. तसेच दिल्लीच्या प्रशिक्षण विभागात मोहम्मद कैफ आणि अजित रात्रा यांसारखे दिग्गजही आहेत.
दरम्यान दिल्ली संघाने पाँटिंगच्या प्रशिक्षणाखाली गेल्या २ वर्षात अतिशय प्रभावी प्रदर्शन केले आहे. २०२० मध्ये दिल्लीचा संघ उपविजेता राहिला होता. तर आयपीएल २०२१ मध्येही त्यांनी प्लेऑफपर्यंतचा प्रवास केला होता. अद्याप या संघाला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. परंतु त्यांचे मागील २ वर्षांतील प्रदर्शन पाहता, हा संघ यंदा ट्रॉफीची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सर्व ठिक, पण…’, कर्णधार रोहित शर्मा झाला पत्नी रितिकाकडूनच ट्रोल
Video: टीम इंडियाच्या बसमध्ये चढला ‘पुष्पा’ फिवर! चहलसह हे खेळाडू म्हणतायेत, ‘झुकूंगा नही’