आयपीएल २०२२ च्या पाचव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाला पराभव पत्करावा लागला आणि राजस्थानने ६१ धावांनी विजय मिळवला. हैदराबादच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची गोलंदाजी ठरली. राजस्थानच्या फलंदाजांपुढे हैदराबादची गोलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली आणि त्यामुळे त्यांना विजायसाठी मोठे लक्ष्य मिळाले. एवढेच नाही, तर त्यांनी पॉवर प्लेदरम्यान चार नो बॉल देखील टाकले.
सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली आणि मर्यादित २० षटकांमध्ये २१० धावा ठोकल्या. राजस्थानच्या फलंदाजीवेळी पहिल्याच षटकात हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) गोलंदाजीसाठी आला. भुवनेश्वरने पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर सलामीवीर जॉस बटलरला झेलबाद केले होते, पण पंचांनी नंतर तो चेंडू ‘नो बॉल’ असल्याचे सांगितले आणि बटरलला जीवनदान मिळाले. बटलरची विकेट हैदराबादला महागात पडली कारण त्याने राजस्थानला एक चांगली सुरुवात करून दिली. सलामीवीर जॉस बटलर (३५) आणि यशस्वी जयस्वाल (२०) यांनी ५८ धावांची भागीदारी केली.
पहिल्या षटकात भुवनेश्वरने जरी नो बॉल टाकला असला, तरी स्ट्राइकवर असलेला बटलर त्याचा फायदा घेऊ शकला नाही. त्यानंतर भुवनेश्वर जेव्हा त्याचे दुसरे षटक टाकण्यासाठी आला, त्याने पुन्हा एक नो बॉल टाकला आणि पुन्हा फ्री हीट मिळाली. यावेळी स्ट्राइवर असलेल्या यशस्वी जयस्वालने स्टंपच्या मागे चौकार मारला.
पॉवर प्लेमध्ये दोन नो बॉल पडूनही हे सत्र थांबले नाही. सामन्याच्या चौथ्या षटकात वेगवान गोलंदाज उमरान मलिक गोलंदाजीसाठी आला आणि सामन्यातील तिसरा नो बॉल टाकला. त्यावेळी जोस बटलर स्ट्राइकवर होता आणि तो पुन्हा एकदा फ्री हीटचा फायदा घेऊ शकला नाही. त्यानंतर पाचव्या षटकात वशिंगटन सुंदर गोलंदाजीला आला आणि त्यानेही षटकाची सुरुवात नो बॉलने केली. परंतु, यावेळीही राजस्थानच्या फलंदाजांना फ्री हीटचा फायदा घेता आला नाही. अशा प्रकारे पॉवर प्लेमध्ये हैदराबादच्या गोलंदाजांनी एकूण ४ नो बॉल टाकले.
सामन्याचा विचार केला, तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या ५५ धावांच्या जोरावर संघाने २११ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद ७ विकेट्सच्या नुकसानावार १४९ धावा करू शकला. हैदराबादसाठी एडेम मार्करमने सर्वाधिक ५७ धावा केल्या.