भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली जेवढा त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी प्रसिद्ध आहे, तेवढाच मैदानात केलेली भांडणे आणि स्लेजिंगसाठी देखील. आयपीएल २०२० मध्ये विराट कोहलीचा सामना मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवशी झाला. या दोघांमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादाविषयी आता सूर्यकुमार बोलला आहे. विराट त्याच्याकडे रागात पाहत असताना सूर्यकुमारच्या डोक्यात नेमका काय विचार सुरू होता, याविषयी सूर्यकुमारने खुलासा केला आहे.
‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ कार्यक्रमात बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, त्याने विराटसोबत जाणून बुजून वाद घातला नव्हता आणि जे घडले, ते आपोआप घडले. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) म्हणाला की, “विराट जेव्हा कधी मैदानात असतो, तेव्हा त्याची ऊर्जा एका वेगळ्याच पातळीवर असते. तो सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा होता. विराट त्यादिवशी खूप स्लेजिंग करत होता. मी स्वतःला सांगितले होते की, बोलायचे नाहीय आणि खेळावर लक्ष द्यायचे आहे, मग काहीही होऊ देत काहीच बोलायचे नाहीय.”
“जेव्हा चेंडू गेला आणि त्याने इशारा केला, तेव्हा मी त्याला रागात पाहू लागलो. हे आपोआप झाले. मी ठरवून असे केले नाही. मी चुइंगम चावत होतो, पण आतमधून खूप घाबरलो होतो. माझ्या ह्रदयाचे ठोके वाढले होते. तो चुइंगम चावत पुढून येत होता, तेव्हा माझी बॅट खाली पडली आणि त्याच निमित्ताने मी नजर वळवली. पुन्हा मी संपूर्ण सामन्यात त्याच्याकडे पाहिले नाही.” असे सूर्यकुमार पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, विराटसोबत आमना-सामना झालेल्या या सामन्यात सूर्यकुमारने मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाची खेळी केली होती.
सूर्यकुमार यादव सध्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. चालू हंगामात मुंबईचे प्रदर्शन जरी निराशाजनक राहिले असले, तरी त्याचे वैयक्तिक प्रदर्शन चांगले राहिले आहे. हंगामाच्या सुरुवातीला दुखापतीमुळे तो उपलब्ध नव्हता, पण जेव्हापासून संघात आला आहे, तेव्हापासून चांगला खेळत आहे. आयपीएल २०२० मधील प्रदर्शनानंतर त्याला भारतीय संघासाठी पदार्पणाची संधी मिळाली होती. मिळालेल्या या संधीचे त्याने उत्कृष्टरित्या सोने देखील केले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Video: लाईव्ह सामन्यात वेंकटेशवर भडकला कर्णधार श्रेयस, मोठ्याने ओरडत व्यक्त केला राग; पण का?
LSGvsRCB | गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचण्यासाठी लखनऊ आणि बेंगलोरमध्ये झुंज, पाहा प्लेइंग इलेव्हन
हर्षल पटेल व्हर्जन २.०! आरसीबीच्या गोलंदाजाचा नवा अवतार, सरावादरम्यान मारला ‘नो लूक सिक्स’