आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात (IPL 2022 mega auction) सनरायझर्स हैदराबादने खेळाडूंवर कोट्यावधी रुपये खर्च करून त्यांना संघात सामील केले. सनरायझर्स हैदराबादने मेगा लिलावात निकोलस पुरन, एडेन मार्करम आणि राहुल त्रिपाठी या खेळाडूंना मोठ्या किंमतीत विकत घेतले. मागच्या हंगामात हैदराबादचे नेतृत्व केलेला केन विलियम्सनला (Kane WIlliamson) यालाही संघाने १४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) याने विलियम्सनविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जाफरच्या मते मेगा लिलावानंतर विलियम्सनची जबाबदारी वाढली आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना वसीम जाफर म्हणाला की, “मला वाटते केन विलियम्सन त्या संघात हैदराबादी बकरा बनणार आहे, म्हणजेच बळीचा बकरा बनणार आहे. त्यांच्याकडे चांगले पर्याय आहेत, परंतु केनला खूप मेहनत करावी लागणार आहे. मला वाटते की, केन विलियम्सनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे. तुमचीही इच्छा नसेल की, त्याने पावरप्लेमध्ये पुढे येऊन शॉट खेळण्याच्या प्रयत्नात स्वतःची विकेट गमवावी. त्याला संघासाठी शेवटपर्यंत टिकून राहावे लागेल, त्यामुळे तिसरा क्रमांक त्याच्यासाठी योग्य आहे.”
मेगा लिलावात सनरायझर्स हेदराबादने युवा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माला तब्बल ६ कोटी २५ लाख रुपये खर्च करून पुन्हा विकत घेतले. वसीम जाफरच्या मते अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करण्यासाठी योग्य पर्याय आहे. तो म्हणाला, “मी प्रत्यक्षात अभिषेकला फलंदाजी करताना पाहिले आहे. कारण तो इंडियन ऑईलसाठी सलामीवीर म्हणून खेळतो. आणि मी त्याला चांगले प्रदर्शन करताना पहिले आहे. तो चांगली गोलंदाजीही करू शकतो. सलामीवीर फलंदाजासाठी तो एक पर्याय आहे.”