---Advertisement---

प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढत असा मिळवला हार्दिकच्या गुजरात टायटन्सने IPL 2022चा मुकूट

On: गुरूवार, जून 2, 2022 4:56 PM
Gujrat-Titans
---Advertisement---

सव्वा लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांच्या साक्षीने पार पडलेल्या, इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या सिझनच्या अंतिम सामन्यात, गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत, आपल्या पहिल्याच हंगामामध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली. गुजरातला त्यांच्याच घरच्या मैदानावर आणि प्रेक्षकांच्या समोर ही जगातील सर्वात प्रतिष्ठित टी२० लीग जिंकण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. त्यांचा हा अद्वितीय प्रवास कसा राहिला?, याची माहिती घेऊया.

मागील वर्षी बीसीसीआयने आयपीएलमध्ये दोन नवीन संघ सहभागी करण्याची घोषणा केली तेव्हा, अनेक उद्योगपती व सेलिब्रिटींनी अहमदाबाद फ्रॅंचाईजीसाठी बोली लावली. लंडनस्थित सीव्हीसी कॅपिटल्सने पाच हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची बोली लावत ही फ्रॅंचाईजी आपल्या नावे केली. तिचे नामकरण गुजरात टायटन्स असे केले गेले. लिलावाआधी दोन्ही नवीन संघांना प्रत्येकी तीन खेळाडू ड्राफ्ट करण्याची परवानगी देण्यात आलेली. येथे बाजी मारत त्यांनी भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या, युवा सलामीवीर शुभमन गिल आणि अफगाणिस्तानचा टी२० दिग्गज राशिद खान यांना आपल्या संघात सामील केले.

यानंतर बारी होती मेगा लिलावाची.‌ मोहम्मद शमी व लॉकी फर्गुसनला संघात घेत त्यांनी चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर त्यांच्या वाट्याला स्टार म्हणावे असे फारसे क्रिकेटर आले नाहीत. राहुल तेवतिया, साई किशोर, अभिनव मनोहर, यश दयाल या अनकॅप खेळाडूंवर त्यांनी कोट्यावधी रुपये लावले. लिलावाच्या शेवटी वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड मिलर या अनुभवी खेळाडूंना संघात सामील करून घेण्यात त्यांना यश आले. तरीही इतरांच्या तुलनेत गुजरात टायटन्स काहीसा कमकुवत संघ वाटत होता.

प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढत असा मिळवला gujarat titanने IPL 2022चा मुकूट

स्पर्धा सुरू होण्याआधीच त्यांना एक मोठा धक्का बसला.‌ अनुभवी इंग्लिश सलामीवीर जेसन रॉय याने स्पर्धेतून माघार घेतली. या धक्क्यातून सावरत त्यांनी स्पर्धेची सुरुवात केली. त्यांचा सलामीचा सामना होता त्यांच्याप्रमाणेच नवखे असलेल्या लखनऊ सुपरजायंट्ससोबत. पहिल्याच षटकापासून मोहम्मद शमीने गुजरातला स्वप्नवत सुरुवात दिली. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर ‌हार्दिक पंड्या व राहुल तेवतिया यांनी फलंदाजीत योगदान देत, गुजरातला विजयी सुरुवात करून दिली. दुसऱ्या सामन्यात त्यांच्यासमोर होती सर्वात मजबुत वाटत असलेली दिल्ली कॅपिटल्स. शुभमन गिलने ८४ धावांची लाजवाब खेळी केल्यानंतर, लॉकी फर्गुसनने आपल्या वेगाच्या जोरावर चार बळी मिळवत संघाला सलग दुसरा विजय मिळवून दिला.

सलग तिसरा विजय मिळवून विजयाची हॅट्रीक पूर्ण करण्याचा त्यांचा मानस होता. पंजाबने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लियाम लिव्हिंगस्टोनच्या तुफानी खेळीच्या जोरावर १९० धावांचे आव्हान गुजरातला दिले. प्रत्युत्तरात शुबमन गिलने ९६ धावांची खेळी केली. मात्र, शेवटच्या दोन चेंडूंवर १२ धावांची गरज असताना हिरो बनून आला राहुल तेवतिया. त्याने या दोन्ही चेंडूवर षटकार ठोकत संघाला सलग तिसरा विजय मिळवून दिला.

गुजरातची ही विजयाची लय तोडली सनरायझर्स हैदराबादने. प्रथम फलंदाजी करताना गुजरात फक्त १६२ धावा करू शकला. प्रत्युत्तरात सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमसनने संयमी अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या एका पराभवानंतर त्यांना विजयी लय मिळवण्यास जास्त वेळ लागला नाही. टेबल टॉपर असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध बॅटिंगची जबाबदारी घेतली कर्णधार हार्दिक पांड्याने. ८७ धावांच्या खेळीने त्याने विजय सुकर केला.

त्यानंतर पुढील सामना होता डिफेंडींग चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध. १७० रनांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. मात्र यावेळी संघाला सावरण्याचे काम केले डेव्हिड मिलर व प्रथमच नेतृत्व करत असलेल्या राशिद खानने. मिलरने नाबाद ९४ आणि राशिदने २१ चेंडूवर ‌४० धावा करून एक थरारक विजय संघाला मिळवून दिला. राजस्थान व चेन्नई पाठोपाठ या वेळी विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी त्यांच्या समोर होती कोलकाता नाईट रायडर्स. कॅप्टन हार्दिकच्या अर्धशतकाच्या जोरावर १५७ पर्यंत मजल मारल्यानंतर, गोलंदाजीत सर्वांनी योगदान देत कोलकाताला ८ धावांनी पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या हाफमध्ये त्यांनी सहा विजय मिळवत प्ले ऑफच्या दिशेने आगेकूच केली.

दुसऱ्या हाफची सुरुवात गुजरातने सनरायझर्स हैदराबादला हरवत केली. यावेळी पुन्हा एकदा राशिद खान व राहुल तेवतिया यांनी फिनिशिंगची जबाबदारी घेतली. १९६ धावांचा पाठलाग करताना वृद्धिमान साहाने ताबडतोब अर्धशतक ठोकले. शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी ‌२२ धावांची गरज असताना तेवतिया व राशीद यांनी तुफान आणत हे लक्ष पार केले. आरसीबीविरुद्ध पुन्हा एकदा धावांचा पाठलाग करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. सलग दुसऱ्या सामन्यात राहुल तेवतिया चमकला, तर यावेळी त्याला साथ दिली डेव्हिड मिलरने. विजय रथावर स्वार असताना अचानक त्यांना सलग दोन पराभवाला सामोरे जावे लागले.

मुंबई इंडियन्स विरुद्ध शेवटच्या षटकात डेव्हिड मिलर ‌९ धावा बनवू शकला नाही आणि पंजाब किंग्सविरूद्ध ते पूर्णपणे फ्लॉप ठरले. मात्र त्यानंतर त्यांचा सामना पुन्हा एकदा झाला लखनऊ सुपरजायंट्सशी. लो स्कोरिंग सामन्यात शुबमन गिलचे अर्धशतक कामी आले. १५० धावांचा पाठलाग करताना लखनऊ संघ ढेपाळला आणि विजयासह गुजरातने प्ले‌ ऑफ्समध्ये दाखल होणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला. आपल्या शेवटच्या साखळी फेरी सामन्यामध्ये देखील त्यांनी विजयाची सवय मोडली नाही, आणि चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत टेबल टॉपर म्हणून प्ले ऑफमध्ये पाऊल ठेवले.

क्वालिफायर १ सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झाला. जोस बटलरच्या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने गुजरात टायटन्ससमोर १८८ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. गुजरातची सुरुवात अडखळत झाली होती. मात्र, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलरने अचानक सामन्याचा नूर पालटला. त्याने जबरदस्त काऊंटर अटॅक करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. अखेरच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज असताना, मिलरने पहिल्या तिन्ही चेंडूवर षटकार खेचत, गुजरातला अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळवून दिला.

घरच्या मैदानावर जवळपास सव्वा लाख प्रेक्षकांच्या साक्षीने गुजरात टायटन्सने आपली पहिली आयपीएल फायनल खेळली. पहिल्या सामन्यापासून सुरू झालेला हा प्रवास त्यांनी विजयाने संपवला. राजस्थान रॉयल्सला या मेगा फायनलमध्ये मात देत, त्यांनी पदार्पणात आयपीएल ट्रॉफी जिंकणारा केवळ दुसरा संघ होण्याचा मान मिळवला. कोणीही विजेतेपदाच्या शर्यतीत ना धरलेल्या गुजरातने सर्वांना या विजेतेपदासह दाखवून दिले, “गेम म्हारी छे”.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

गुजरातला विनर बनवल्यानंतर दिग्गजाने धोनीशी केली पंड्याची तुलना, म्हणाले, ‘तोही असेच करायचा’

द्विपक्षीय टी२० मालिका बंद करा, म्हणजे एका वर्षात २ वेळा आयपीएल होईल; पाहा कोणी केलंय विधान

काय सांगता! रँडी ऑर्टन मोडणार जॉन सीनाचा ‘तो’ जबरदस्त विक्रम, ऑलिम्पिक विजेत्या कर्ट अँगलचा विश्वास

प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढत असा मिळवला gujarat titanने IPL 2022चा मुकूट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---