गुजरात टायटन्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला 5 विकेट्सने धूळ चारली. यासोबतच स्पर्धेत विजयी सुरुवातही केली. मात्र, या सामन्यादरम्यान पुणेकर ऋतुराज गायकवाड याने गुजरात संघाच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. त्याचे शतक हुकले, पण त्याने गुजरात संघावर दबाव निर्माण केला होता. सामना संपल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या यानेदेखील ऋतुराजचे कौतुक केले. तो म्हणाला की, तो भारतीय क्रिकेटसाठी कमाल करेल.
ऋतुराज गायकवाडची खेळी
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. यावेळी सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने संघाच्या दीडशे धावा होईपर्यंत मैदान सोडले नाही. ऋतुराजने सामन्यात अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर त्याने 50 चेंडू खेळून 92 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. त्याच्या खेळीच्याच जोरावर चेन्नईने 7 विकेट्स गमावत 178 धावा केल्या होत्या.
Ru tu the Star! ????⭐#GTvCSK #WhistlePodu #Yellove ???????? pic.twitter.com/R3jH7bczNU
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 31, 2023
हार्दिक पंड्याने केले कौतुक
गुजरात टायटन्स संघाने चेन्नईचे 179 धावांचे आव्हान 19.2 षटकात 5 विकेट्स गमावत 182 धावा चोपून पूर्ण केले. सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना पंड्या म्हणाला की, “त्याने असे काही फटके खेळले, जे शानदार होते. जर तो असेच खेळत राहिला, तर भारतीय क्रिकेटसाठी कमाल करेल. वेळ आल्यावर भारतीय क्रिकेट संघ त्याच्यासोबत असेल.” विशेष म्हणजे, जुलै 2021मध्ये पदार्पण करणाऱ्या ऋतुराजने 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 135 धावा केल्या आहेत.
‘आम्हाला त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना अडचण होत होती’
पुढे बोलताना हार्दिक म्हणाला की, “आम्हाला माहितीये की, तो किती शानदार खेळाडू आहे. एकेवेळी वाटत होते की, चेन्नई 220 किंवा 230 धावा करेल. आम्हाला त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना अडचण होत होती. मला वाटत होते की, आम्हाला त्याला बादच करता येणार नाही.”
‘राहुलने पुन्हा स्वत:ला सिद्ध केले’
संघाच्या प्रदर्शनाविषयी बोलताना तो म्हणाला की, “मी आणि शुबमनच्या विकेटमुळे आम्ही चिंतेत होतो. मात्र, राहुल तेवतियाने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. तसेच, राशिद खानने दाखवून दिले की, तो काय करू शकतो.”
गुजरातला 3 षटकात हव्या होत्या 30 धावा
खरं तर, गुजरातला 3 षटकात 30 धावांची गरज होती. यावेळी विजय शंकर (27) याने राजवर्धन हंगरगेकर (Rajwardhan Hangargekar) याच्या गोलंदाजीवर षटकार मारला. मात्र, एका चेंडूनंतर डेवॉन कॉनवेने त्याला झेलबाद केले. या षटकात फक्त 7 धावा झाल्या होत्या. त्यानंतर राशिद खान (नाबाद 10) याने 19व्या षटकात दीपक चाहरच्या गोलंदाजीवर सलग दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत गुजरातला मदत केली. शेवटच्या षटकात 8 धावांची गरज असताना तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर राहुल तेवतिया (Rahul Tewatia) याने सलग षटकार आणि चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. (ipl 2023 csk vs gt hardik pandya revealed his team facing trouble while bowling to ruturaj gaikwad read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केन विलियम्सनची दुखापत गंभीर, पहिल्याच सामन्यात गुजरातला मोठा धक्का
हेड-टू-हेड आकडेवारी, संभावित प्लेइंग 11 आणि मॅच प्रेडिक्शन, जाणून घ्या पंजाब-केकेआरच्या सामन्याविषीय सर्वकाही