इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा हंगाम संपल्यानंतर चाहत्यांचे लक्ष डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याकडे होते. मात्र, आता डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला आणि ऑस्ट्रेलिया संघ विजेता बनला. यानंतर पुन्हा भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधण्यासाठी एक टी20 लीग सुरू झाली आहे. ज्यामध्ये आयपीएल 2023 अंतिम सामना गाजवणाऱ्या धुरंधराने धमाल केली आहे. एक दिवस आधीच सुरू झालेल्या तमिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात 96 धावांची खेळी साकारणाऱ्या साई सुदर्शन याने जबरदस्त खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले.
साई सुदर्शनची झंझावाती खेळी
सोमवारपासून (दि. 12 जून) कोयंबटूरमध्ये टीएनपीएल 2023 (TNPL 2023) स्पर्धेची सुरुवात झाली. हंगामातील पहिलाच सामना लायका कोवई किंग्स विरुद्ध आयड्रीम तिरुपूर तमिजंस (Lyca Kovai Kings vs iDream Tirupur Tamizans) संघात पार पडला. या सामन्यात कोवई किंग्स संघाकडून खेळताना साई सुदर्शन (Sai Sudarshan) याने 45 चेंडूत 86 धावांची झंझावाती खेळी साकारली. या सामन्यात किंग्सची सुरुवात चांगली झाली नव्हती.
अवघ्या 45 चेंडूत 86 धावा
सामन्याच्या दुसऱ्याच षटकात 21 वर्षीय साई सुदर्शन फलंदाजीला आला. त्याने येताक्षणीच आयपीएल 2023 (IPL 2023) अंतिम सामन्यातील अंदाजात फलंदाजीची सुरुवात केली. तो किंग्सच्या डावातील अखेरच्या चेंडूवर बाद झाला, त्यावेळी त्याने 45 चेंडूत 86 धावांचा पाऊस पाडला. सुदर्शनने या खेळीत 4 षटकार आणि 8 चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार शाहरुख खान यानेही अवघ्या 15 चेंडूत 25 धावांचा पाऊस पाडला. या दोघांच्या जोरावर किंग्स संघाने 7 विकेट्स गमावत 179 धावा चोपल्या. विशेष म्हणजे, या आव्हानाचा पाठलाग करताना तमिजंस संघाला 20 षटकात 109 धावाच करता आल्या. त्यामुळे किंग्सने हा सामना 70 धावांनी जिंकला.
साई सुदर्शनचा आयपीएल धमाका
यापूर्वी साई सुदर्शनने आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 96 धावांची वादळी खेळी साकारली होती. मात्र, हा सामना गुजरातला जिंकता आला नव्हता. असे असले, तरीही टीएनपीएलच्या पहिल्या सामन्यात सुदर्शनने साकारलेल्या खेळीमुळे कोवई किंग्स 70 धावांनी विजयी झाला. (ipl 2023 final hero sai sudharsan scored 86 runs in 45 balls in tnpl 2023 opening match lyca kovai kings vs idream tiruppur tamizhans read here)
महत्वाच्या बातम्या-
चेन्नईच्या शिलेदाराने केले गुपचूप लग्न; पण मित्राला बोलावून फसला आणि फोटो मीडियात पोहोचला
BREAKING! भारताच्या वेस्ट इंडीज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला सुरू होणार थरार