इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडे एकापेक्षा एक खेळाडूंचा भरणा आहे. त्यामध्ये युझवेंद्र चहल या अनुभवी फिरकी गोलंदाजाचाही समावेश आहे. आता याच गोलंदाजाविषयी मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. राजस्थानकडून खेळण्यापूर्वी चहल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. मात्र, संघाने त्याला मुक्त केले. अशात इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने आरसीबीच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने समालोचनादरम्यान म्हटले आहे की, काय माहिती आरसीबीने चहलसारख्या शानदार गोलंदाजाला मुक्त का केले होते.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्याबाबत बोलायचं झालं, तर त्याने त्याचे आयपीएल पदार्पण मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून केले होते. मात्र, त्याला सर्वाधिक यश हे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून खेळताना मिळाले. त्याने 2014 ते 2021 यादरम्यान बेंगलोरकडून खेळताना 113 सामन्यांमध्ये 7.58च्या इकॉनॉमी रेटने 139 विकेट्स घेतल्या. मात्र, आयपीएल 2022च्या मेगा लिलावापूर्वी आरसीबी संघाने त्याला मुक्त केले होते. त्यानंतर त्याला राजस्थान रॉयल्स संघाने लिलावात 6.5 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले.
चहल मागील 2 हंगामांपासून राजस्थान संघाचा भाग आहे. तसेच, तो राजस्थानसाठी चांगली कामगिरीदेखील करत आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत 11 विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळेच केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने बेंगलोरच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.
काय म्हणाला पीटरसन?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना केविन पीटरसन म्हणाला की, “आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या भेटवस्तूपैकी एक आहे, युझवेंद्र चहलचे राजस्थान रॉयल्समध्ये जाणे. काहीच कल्पना नाहीये की, आरसीबीने चहलला कसे काय जाऊ दिले. तो नेहमीच विकेट्स घ्यायचा आणि संघासाठी नेहमी सामन्यात चांगली कामगिरी करायचा. हे पाहून विश्वास बसत नाहीये की, हा खेळाडू आता गुलाबी जर्सीमध्ये खेळत आहे. चेंडूसोबत तो आरसीबीचा सर्वात मोठा खेळाडू होता.”
युझवेंद्र चहलची आयपीएल कारकीर्द
युझवेंद्र चहल याच्या एकूण आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 137 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 7.64च्या इकॉनॉमी रेटने 177 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 40 धावा खर्च करत 5 विकेट्स ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. (ipl 2023 former cricketer kevin pietersen questioned rcb decision to release yuzvendra chahal)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 मध्ये ‘या’ संघांनी नवीन कर्णधार नेमून केली मोठी चूक! पाहा आकडेवारी
कॅप्टन्सी सोडल्यानंतर 566 दिवसांनी विराट पुन्हा बनला कर्णधार, ‘या’ कारणामुळे सांभाळली संघाची धुरा