शुक्रवारी (दि. 26 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणारा दुसरा क्वालिफायर सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता गगनाला भिडली आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स आमने-सामने असणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण, या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात एन्ट्री करेल. तिथे त्यांचा सामना महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध होईल. या संपूर्ण हंगामात गुजरात संघाने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. अशात क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई संघाला गुजरातच्या 5 खेळाडूंपासून सावध राहावे लागेल.
1. शुबमन गिल
यादीत पहिल्या स्थानी नाव आहे शुबमन गिल (Shubman Gill) याचे. हे नाव मागील काही महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहे. त्यामागील कारण आहे गिलचे जबरदस्त प्रदर्शन. गिलने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने आयपीएल 2023 स्पर्धेत 15 सामने खेळताना 55.54च्या सरासरीने 722 धावा केल्या आहेत. सध्या ऑरेंज कॅप फाफ डू प्लेसिस (730) याच्या नावावर आहे. मात्र, गिलने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात 9 धावा करताच ऑरेंज कॅप त्याच्या नावावर होऊ शकते. अशात मुंबईला त्याच्यापासून सावध राहावे लागेल.
2. मोहम्मद शमी
गुजरात संघाच्या वेगवान फळीचा हुकमी एक्का म्हणजेच मोहम्मद शमी (Mohammed Shami) होय. शमीने आतापर्यंत 15 सामने खेळताना 26 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 7.66 इतका आहे. 59 षटके टाकताना त्याने 452 धावाही खर्च केल्या आहेत. त्याने एका डावात 4 विकेट्स घेण्याचा विक्रम या हंगामात दोन वेळा केला आहे. सध्या पर्पल कॅप जिंकण्याच्या शर्यतीत तो सर्वात पुढे आहे.
3. राशिद खान
यादीतील तिसरे नाव आहे राशिद खान (Rashid Khan). या अफगाणी पठ्ठ्याने बॅट आणि चेंडू दोन्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने 15 सामन्यात आतापर्यंत 25 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, 60 षटकात त्याने 475 धावाही खर्च केल्या आहेत. यावर्षी 4 विकेट्स घेण्याचा कारनामा त्याला एकदा करता आला आहे. याव्यतिरिक्त त्याने 7 डावात फलंदाजी करताना 125 धावाही केल्या आहेत. यादरम्यान नाबाद 79 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
4. विजय शंकर
आयपीएल 2023 हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या गुजरातच्या खेळाडूंमध्ये चौथ्या स्थानी विजय शंकर (Vijay Shankar) आहे. शंकर मुंबईसाठी धोका ठरू शकतो. त्याने या हंगामात 10 डावात फलंदाजी करताना 37.63च्या सरासरीने 301 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 160.10च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. त्याची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद 63 आहे.
5. मोहित शर्मा
गुजरातकडून खेळताना मोहित शर्मा याने 12 सामन्यात आपला जलवा दाखवला आहे. त्याने यादरम्यान एकूण 8.11च्या इकॉनॉमी रेटने 19 विकेट्स चटकावल्या आहेत. त्याने 38.5 षटके गोलंदाजी करताना आतापर्यंत 315 धावाही खर्च केल्या आहेत. तसेच, 4 विकेट्स घेण्याची कामगिरी त्याला 1 वेळा करण्यात यश आले आहे. अशात मुंबई संघाला या खेळाडूविरुद्ध काहीतरी रणनीती आखण्याची गरज पडू शकते. (ipl 2023 qualifier 2 mumbai indians should careful from these 5 players of gujarat titans see list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंड्याने CSKविरुद्ध केलेला मास्टरप्लॅन फसला; पुन्हा ‘ती’ चूक केली, तर भंगेल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न!
Qualifier 2मध्ये गतविजेत्या गुजरातचा काटा काढणार का मुंबईची पलटण? सामन्याविषयी सर्वकाही एकाच क्लिकवर