गतविजेता गुजरात टायटन्स संघ इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन करताना दिसत आहे. गुजरातने साखळी फेरी संपल्यानंतर 14 सामन्यांपैकी 10 सामने खिशात घालत 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले होते. मात्र, चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने चॅम्पियन संघाप्रमाणे खेळ दाखवला नव्हता. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच संघाल बाद फेरीतील सामन्यात दबावाचे वाटत असेल. महेंद्र सिंग धोनी याच्या चेन्नई संघाविरुद्ध हार्दिक पंड्या याने एक चूक केली होती, ज्याचा फटका त्यालाही आणि त्याच्या संघालाही बसला होता. आता मुंबई इंडियन्स संघाविरुद्धही त्याने ही चूक केली, तर त्यांचा प्रवास संपुष्टात येईल.
आता हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध कोणती चूक केली होती, जी त्याला चांगलीच महागात पडली? चला त्याविषयी जाणून घेऊयात. खरं तर, क्वालिफायरसारख्या मोठ्या सामन्यात पंड्याने संघाच्या फलंदाजी क्रमात मोठा बदल केला होता. त्यानंतर त्याचा हा निर्णय त्याच्याच अंगलट आला.
फलंदाजी क्रमात बदल
सीएसके (CSK) संघाने क्वालिफायर 1 (Qualifier 1) सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला 173 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने 22 धावांवर वृद्धिमान साहाची विकेट गमावली होती. त्यानंतर फलंदाजी क्रमात बदल करत पंड्या स्वत: फलंदाजीला उतरला होता. खरं तर, या सामन्यापूर्वीपर्यंत विजय शंकर (Vijay Shankar) तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता. चेन्नईविरुद्ध खेळताना पंड्या अवघ्या 8 धावांवर तंबूत परतला आणि सलग दोन धक्क्यांमुळे गुजरातची गाडी रुळावरून घसरली.
क्वालिफायर 1पूर्वी पर्यंत विजय शंकरने तिसऱ्या स्थानी चांगली फलंदाजी केली होती. त्याने 12 सामन्यात 301 धावा केल्या होत्या. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यातही 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या क्रमांकावर 35 चेंडूत 53 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात शुबमन गिल आणि त्यामध्ये 71 धावांची भागीदारी झाली होती. मात्र, चेन्नईविरुद्ध विजयच्या जागी पंड्या उतरल्यामुळे त्याचा प्रयोग फसला.
विजय शंकरला चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सहाव्या स्थानी फलंदाजीसाठी पाठवले. तोपर्यंत सामना गुजरातच्या हातून निसटला होता. 88 धावांवर 5 विकेट्स पडल्या होत्या. फलंदाजी क्रमात झालेल्या या बदलामुळे विजयच्या फलंदाजीवर परिणाम झाला आणि तो 14 धावा करून बाद झाला.
हार्दिक पंड्या मागील काही सामन्यांपासून मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने या हंगामात 14 सामन्यात 297 धावा केल्या आहेत. अशात जर मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याने सीएसकेविरुद्ध केलेली चूक पुन्हा केली, तर गुजरातला पुनरागमन करण्यास अडचण येऊ शकते. तसेच, दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभूत होऊन सलग दुसरी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्नही धुळीस मिळू शकते. (gt vs mi ipl 2023 qualifier 2 skipper hardik pandya one mistake in qualifier 1 against ms dhoni csk cost gujarat titans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Qualifier 2मध्ये गतविजेत्या गुजरातचा काटा काढणार का मुंबईची पलटण? सामन्याविषयी सर्वकाही एकाच क्लिकवर
“आम्ही सुपरस्टार खेळाडू घडवतो”, रोहितने सांगितली चॅम्पियन मुंबई इंडियन्सची खासियत